संकल्प विद्यामंदिर शाळेने गुणवत्तापूर्ण शाळा अशी स्वतःची ओळख निर्माण केली - शिक्षणतज्ज्ञ प्रा.शिवराज मोटेगावकर









संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या "सुवर्णरत्न" पुरस्काराने अभिजीत जगताप, मुख्तार शेख, सुकुमार देशमुख आणि कल्पना देशपांडे सन्मानित

===============================

संपादक - रणजित डांगे 

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

येथील संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या "सुवर्णरत्न" पुरस्कारांचे वितरण यावर्षी रविवार, दि.25 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले. यावर्षी हे पुरस्कार अभिजीत जगताप (पत्रकारिता), मुख्तार शेख (सामाजिक), सुकुमार देशमुख (शिक्षण) आणि कल्पना देशपांडे (कला) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

रविवारी आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात हा अत्यंत दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना प्रा.शिवराज मोटेगावकर म्हणाले की, अंबाजोगाई शहर हे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. संकल्प विद्या मंदिरने शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा पॅटर्न निर्माण केला आहे. हे सभागृहातील पालकांची मोठी गर्दी पाहून लक्षात येते, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, असे वंदनिय महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. भगवद्गीतेचा संदर्भ देत विद्या दान हे पुण्याचे काम आहे. शिक्षण क्षेत्रात चोले दांम्पत्य अत्यंत तळमळीने हे कार्य करीत आहेत. प्रा.मोटेगावकर यांनी स्वतःचे अनुभव ही सांगितले. ज्या घरात आई स्ट्रॉंग असते ते घर मजबूत असते. घरात शैक्षणिक वातावरण निर्माण करा. अभ्यासामुळे जीवनाला दिशा मिळते. विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लावा, आवड निर्माण करा. कारण, शिक्षण हेच सर्वस्व आहे. शिक्षणामुळे जीवनाला गती मिळून कुटुंबाची प्रगती होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा होमवर्क पूर्ण करून घ्यावा, शालेय उपक्रमात सहभागी व्हावे, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी नवे शैक्षणिक धोरण समजून घ्यावे. जेवढा शिक्षक चांगला, तेवढी शाळा चांगली. त्यामुळेच संकल्प विद्यामंदिर शाळेने गुणवत्तापूर्ण शाळा अशी शिक्षण क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. भविष्यात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संकल्प विद्या मंदिर शाळेचा शैक्षणिक क्षेत्रात वटवृक्ष होणार असल्याचे गौरवोद्गार शिक्षणतज्ज्ञ प्रा.मोटेगावकर यांनी काढले. उद्घाटक म्हणून बोलताना ऍड.शोभाताई लोमटे (ज्येष्ठ विधी तज्ज्ञ तथा समाजसेविका) म्हणाल्या की, शिक्षण क्षेत्रात संकल्प विद्यामंदिर शाळेने गुणवत्तेचा पॅटर्न निर्माण केला आहे. अंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेरघर आहे. या भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी लोकनेते सुनिलकाका लोमटे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही काम करीत आहोत असे ऍड.लोमटे सांगितले. व लातूर पॅटर्न संपूर्ण देशात घेऊन जाणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ प्रा.शिवराज मोटेगावकर यांनी अंबाजोगाईत आपली डॉक्टर तयार करायच्या फॅक्टरीची शाखा सुरू करावी जेणेकरून गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना व पालकांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. यावेळी संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना "सुवर्णरत्न" पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण व मार्गदर्शक आरसीसी पॅटर्नचे संस्थापक संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर (लातूर) हे होते. तर उदघाटक म्हणून ऍड.शोभाताई लोमटे (ज्येष्ठ विधी तज्ज्ञ तथा समाजसेविका) या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गंभीरे (नगरसेवक, न.प.अंबाजोगाई) तर प्रमुख अतिथी म्हणून मुमताज पठाण (ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.अंबाजोगाई), रामेश्वर मुंडे (महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी), विशाल जाजू ( बांधकाम सभापती, योगेश्वरी औद्योगिक वसाहत), दगडू लोमटे (प्रमुख, सुवर्णरत्न पुरस्कार वितरण समिती) हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुक्तार शेख (समाजसेवा), अभिजीत जगताप (पत्रकारिता), सुकुमार देशमुख - मोरे (शिक्षण) आणि कल्पना देशपांडे - महाजन (कला) या मान्यवरांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सुवर्णरत्न पुरस्कार-2024 देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, फेटा, श्रीफळ, पुष्पहार व पुष्पगुच्छ असे होते. सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे यांनी केला. तर प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. प्रतिमापूजन, दीपप्रज्ज्वलनानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख मांडणारा माहितीपट दाखविण्यात आला. प्रास्ताविक विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका रेखाताई बडे यांनी केले. तर सन्मानपत्राचे वाचन श्रीमती आर.एस.मोहाडे यांनी केले. यावेळी स्कॉलरशिप करीता पात्र ठरलेल्या प्रगती सुधाकर केंद्रे, आरोही उत्तरेश्वर बनाळे, गौरी अशोक नखाते, श्रावणी ओमप्रकाश कागणे, ओंकार हरिभाऊ लोमटे आणि पृथ्वीराज तात्याराव निकम या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या विविध विभागप्रमुखांचा चांदीचे नाणे व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सोबतच संकल्प विद्या मंदिर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तब्बल 31 विविध हिंदी, मराठी गीत प्रकारातून आपला कलाविष्कार सादर केला. आणि उपस्थित मान्यवर, पालक वर्गाची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.एस.हरंगुळे आणि श्रीमती प्रिया नायक यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्रीमती कौशल्या शिंदे यांनी मानले. या पुरस्कार वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संकल्प विद्या प्रतिष्ठानचे सचिव प्रा.कैलास भागवत चोले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सुभाष बडे, सांस्कृतिक विभागप्रमुख श्रीमती ए.व्ही.कुलकर्णी, श्रीमती जे.आर हनवते व संकल्प परिवाराच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तर आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृह पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने तुडुंब भरले होते. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.


================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)