अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार 'साम' टीव्हीच्या सोनाली शिंदे यांना दिमाखदार सोहळ्यात प्रदान

माध्यमं मुकी झाल्याने सोशल मिडियाचा प्रभाव वाढला आहे : सोनाली शिंदे

अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार 'साम' टीव्हीच्या सोनाली शिंदे यांना दिमाखदार सोहळ्यात प्रदान

===============================

संपादक : रणजित डांगे 

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. माध्यमांवर प्रस्थापितांचे वर्चस्व वाढल्याने सत्य काय ? किंवा वास्तव काय ? हे माध्यमांना सांगता येत नाही. परंतू, त्यामध्ये काम करणारे प्रामाणिक पत्रकार असले तरी त्यांची केवळ घालमेल आहे. शिवाय विद्यमान परिस्थितीत माध्यमं मुकी झाल्याने सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. समाजाचे खरे चित्र या माध्यमातून पुढे येऊ लागले आहे, असे मत 'साम' टीव्ही मराठीच्या वृत्तनिवेदिका सोनाली शिंदे यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार वितरण व 'मूकनायक' दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 


अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने बुधवार दिनांक 31 जानेवारी रोजी 'मूकनायक' दिनानिमित्त राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार वितरण व समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंत व प्रज्ञावंतांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शिका 'साम' टीव्ही मराठीच्या वृत्तनिवेदिका सोनाली शिंदे यांना राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दि. ना. फड, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे उपस्थित होते.

प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना सोनाली शिंदे यांनी माध्यम क्षेत्रातील भीषण वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. न्यूज रूम आणि बाहेरची दुनिया यातील खरं अंतर स्पष्ट केलं. बोलताना शिंदे म्हणाल्या की, आजची स्थिती नक्कीच गंभीर आहे पण त्यावर मातही होऊ शकते. समाजासमोर मांडले जाणारे प्रश्न आणि वास्तव हे खरे असतात का ? याचे चिंतन होण्याची गरज आहे. सध्याचे वातावरण हे खऱ्या अर्थाने 'स्क्रिप्टेड' असतं, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. मला दिलेला पुरस्कार हा माझ्या कामाची पावती नव्हे तर आणखी दोन पाऊलं पुढे टाकण्यासाठी ते बळ असल्याचे मी मानते. माध्यमांवर प्रचंड दबाव आहे, माध्यमं ही प्रस्थापितांच्या मालकीची असल्याने त्यावर कोणी आवाज उठवू शकत नाही. माध्यमं ही मुकी झाली आहेत, म्हणून सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. प्रस्थापितांवर आणि सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी ठरू लागला आहे. मोबाईल रिपोर्टिंगमुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होऊ लागली आहे. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाने 'मूकनायक' दिनाच्या निमित्ताने समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत. ज्यात गुणवंत, कुशल कारागीर, बचत गट, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी यांचा सन्मान केला, तो कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले. सोनाली शिंदे यांनी आपल्या विस्तारित भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांचे आभारही मानले. 

अध्यक्षीय समारोप करताना राजकिशोर मोदी म्हणाले की, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ हा नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतो. सामाजिक जाणीवा जिवंत असणारा हा संघ असून 'मूकनायक' दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान केला जात आहे ही अभिनंदनीय बाब आहे. अशा उपक्रमांंमुळे नवतरुणांना प्रोत्साहन मिळते, असं मत मोदी यांनी व्यक्त केले. 

यावेळी ऋतुजा संदिपान ठोके, श्रीनिवास घनघाव, स्नेहा सतीश परदेशी, करण विश्वनाथ चव्हाण, पूजा विजयकुमार सूर्यवंशी, जय बालाजी बचत गट, अक्षयकुमार पवार, स्वावलंबी महिला बचत गट आदींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन परमेश्वर गित्ते यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप तरकसे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे, सचिव, गणेश जाधव, जेष्ठ सदस्य जगन बापू सरवदे, प्रा. प्रदीप तरकसे ,परमेश्वर गित्ते, दादासाहेब कसबे, रोहिदास हातागळे, संभाजी मस्के, धनंजय जाधव, विश्वजीत गंडले, दत्ता वालेकर, प्रवीण कुरकुट, रवी आरसुडे, रतन मोती, प्रवीण दासूद यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

=================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)