व्हॅलेंटाईन डे विशेष : प्रेम म्हणजे आकर्षण नव्हे, तर समर्पण होय ; केशरताई व गुलाबराव सिरसट यांच्या प्रेमाची गोष्ट
==========================
" त्या दोघांची आरोग्य खात्यात नौकरी. नौकरीच्या निमित्ताने सतत संपर्क वाढला आणि त्यातून नकळत दोघांना एकमेकांची ओढही निर्माण झाली. पुढे त्यांनी आपल्या विचारांशी ठाम राहत. निर्णय घेतला. ते दोघे एकत्र आले. त्यांनी विवाह केला. एक आदर्श, सुखी आणि समाधानी कुटुंब म्हणून त्यांची समाजात सर्वदूर ओळख आहे. ही गोष्ट आहे केशरताई व गुलाबराव सिरसट यांच्या अतुट प्रेमाची. त्यागाची, समर्पणाची, विश्वासाची, परस्परांबद्दल आदराची भावना जी आजच्या नव्या पिढीला ही माहिती झाली पाहिजे, यासाठी खास व्हॅलेंटाईन - डे निमित्त आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. केशरताई व गुलाबराव सिरसट यांच्या समर्पित प्रेमाची आठवण करून देणारा आनंददायी जीवनप्रवास..."
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीचे असताना देखील परिस्थितीवर मात करून ते दोघे ही उच्च शिक्षित झाले. नौकरीच्या निमित्ताने त्यांच्यात मैत्री झाली. गुलाबराव सिरसट यांना सांस्कृतिक कार्यक्रमांतून पोवाडे सादर करण्याची आवड होती. तर केशरताई सिरसट यांना वाचनाची आवड होती. दोघंही तसे कवी मनाचे. वाचन, गप्पा, चर्चा, विविध उपक्रम यांतून त्यांचा संपर्क वाढत गेला आणि त्यातून नकळत दोघांना एकमेकांची ओढही निर्माण झाली. सोबत कमी झाली नाही. सहवासातून एकेमकांना नीट ओळखून, पारखून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि विवाह करण्याचा इरादा पक्का केला. केशरताई या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मोहा गावचे कम्युनिस्ट चळवळीतील प्रसिद्ध नेते मारोती शिंदे यांच्या कन्या आहेत. तर गुलाबराव सिरसट हे बीड जिल्ह्यातील अरणवाडी (ता.धारूर) येथील मोलमजुरी करणाऱ्या श्रमजीवी कुटुंबातील. अशा केशरताई व गुलाबराव यांचा विवाह १९८८ साली झाला. लग्नानंतर अनेक बाबींवर मात करून ते दोघे त्यातूनही मार्ग काढत राहिले, आणि स्वतःच्या स्वभावात बदल न घडवता वाटचाल करीत राहिले. त्यांना १९८९ ला मुलगा अक्षय व १९९४ ला मुलगी झाली. मुलगा नामांकित संस्थेत नौकरीस आहे. तर मुलीचे लग्न झाले आहे. केशरताई या बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील मोहा या गावात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचं कुटुंब मोठं होतं. त्या घरात सर्वांत लहान. वडील कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. कुटुंबात मुलींनी शिकावं या विचार परंपरेतले होते. आई - वडील दोघांनाही लोकसेवेची आवड. त्यामुळे केशरताई याही लहान वयापासूनच वाचायला लागल्या. उच्च शिक्षण घेऊन त्या आरोग्य खात्यात कार्यरत होत्या. त्या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत. तर गुलाबराव सिरसट हे देखील आरोग्य सहाय्यक या पदावरून ३७ वर्षे लोकसेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण व संस्कार देण्याच्या बाबतीत केशरताई या खूप काटोकोर आहेत. म्हणून दोन्ही मुलांची अभ्यासातली प्रगती ही उत्तमच होती. घरात सतत उच्च शिक्षित लोकांचा राबता असायचा. त्यातून नकळत काही संस्कार मनावर उमटत होते. पहिल्यापासूनच दोघे धाडसी वृत्तीचे होते. दोघेही आपापल्या गावातून सर्वप्रथम नौकरीला लागणारे व्यक्ती आहेत.नौकरी सोबतच सामाजिक गोष्टीत ही सहभाग वाढला. वैचारिक दृष्टी विकसित होवू लागली. मार्क्सवादी विचारांचा प्रभाव असल्याने केशरताई यांनाही आपण आयुष्यात गोरगरिबांसाठी कामं केलं पाहिजे याचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. नौकरीच्या निमित्ताने नियमित भेटी व्हायला लागल्या. बोलणं व्हायला लागलं आणि मैत्री वाढत गेली. केशरताई या बोलक्या तसेच कडक शिस्तीच्या आहेत. तर गुलाबराव हे समवयस्क मुलांपेक्षा गंभीर, वैचारिक मित्रांमध्ये जास्त रमायला लागले. प्राध्यापक, समाजकार्य करणारी मंडळी हे त्यांचे मित्र होते. त्यातून त्यांचा चांगला ग्रुप झाला आणि या सगळ्यातून केशरताई व गुलाबराव यांची मैत्री टिकून राहिली. परस्परांविषयीचा आदर वाढत होता. शिवाय दोघांचं वागणं पारदर्शी होतं. दोघांनी संवेदनशीलता आणि वैचारिक समज जोपासली. दोघांचीही विचारसरणी एकच आहे. कुठलंही बंधन आम्ही एकमेकांवर लादत नाही. त्यामुळंचं तर आमचं पटतं. शिवाय गुलाबराव हे अतिशय शांत, संयमी स्वभावाचे आहेत. तर केशरताई या स्पष्टवक्ती आहेत. गुलाबराव यांचा स्वभाव मुळातच शांत असल्यानं कधी ही भांडणाचा प्रसंग ओढवला नाही. मुळात कोणत्याही दोन व्यक्तींचं पटण्यासाठी त्यांच्यात मैत्री असणं आवश्यक असतं. एकमेकांवर विश्वास असला पाहिजे. एकमेकांना समजून घेण्याची कुवत असली पाहिजे. एकमेकांचे विचार तंतोतंत नाही जुळले तरी काही गोष्टी तरी सामाईक असायला हव्यात. या सगळ्या गोष्टी केशरताई व गुलाबराव या दोघांत आहेत. म्हणूनच तर एक यशस्वी दांम्पत्य म्हणून ते दोघे ही आज समाजात, मित्र परिवारामध्ये सुपरिचित आहेत. ते त्यांच्या लग्नाचे वाढदिवस ही मित्र परिवारासोबत साजरा करतात. याबाबत केशर सिरसट म्हणतात की, स्त्रियांनी ही आपल्या निर्णयावर ठाम राहणं, सर्व तर्हेच्या संकटांसाठी तयार राहणं गरजेचं आहे. अनेकदा प्रेमात आवश्यक असणारी हिंम्मत त्या दाखवत नाहीत. लगेच घाबरून जातात. आपण जे धाडस करीत आहोत. त्याच्या वाटेत काटे आहेत. हे कोणतंही पाऊल उचलण्याआधी लक्षात ठेवायला हवं. आपले दिवस बदलण्याची ताकद स्त्रियांमध्ये जास्त असते. असे केशरताई म्हणाल्या तर गुलाब सिरसट यांनी सांगितले की, मला केशर यांनी कुटुंब सांभाळताना खूप मदत व सहकार्य केले. सर्व प्रसंगात माझ्या पाठीमागे सावली प्रमाणे खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभी राहिली. म्हणून मला वाटते की,आपण जे काही निर्णय घेतो त्याबाबत आपल्याला समाधानाची भावना वाटत असेल तर तो निर्णय आपण बिनधास्त घ्यावा. हीच भावना आमच्या लग्नात आहे. तुम्ही यश कशात पाहता...पैशांत की, तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये ? यावर तुमचं नातं बहरणार कि, कोमेजणार हे ठरतं. आम्ही आमच्यातला विचार नेहमीच महत्त्वाचा मानला. त्यामुळे बाकी गोष्टी आपोआपच गौण होत गेल्या. एकमेकांना समजून, सांभाळून घेत पुढं जात असल्यानेच कदाचित आमचे सहजीवन यशस्वी झालेय. सेवानिवृत्तीमुळे घरात करमत नाही, जुने मित्र, सहकारी भेटत नाहीत. पण, नातीला सांभाळण्याचा आनंद काही वेगळाच आहे असे गुलाबराव म्हणाले. आणि या दोघांमुळेच शिंदे व सिरसट या कुटुंबाचा शैक्षणिक विस्तार झाला व त्यामुळे कुटुंबात नौकरीला लागण्याचे प्रमाण अधिक आहे. आज गुलाबराव व केशरताई यांच्या कुटुंबात मुलगा, सुनबाई, मुलगी व नात हे अत्यंत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. हे आजच्या आधुनिक समाजात आपण एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे असे म्हणतो. तेव्हा अशावेळी सिरसट कुटुंबातील आदर, स्नेहभाव व आपुलकी ही प्रेरणा देणारी आनंददायी घटना आहे. केशरताई व गुलाबराव यांच्या यशस्वी सहजीवनाकडे पाहून प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नव्हे तर परस्परांविषयी आदर, त्याग, समजूतदारपणा, जबाबदारी व समर्पण भाव असल्याचे दिसून येते. केशरताई व गुलाबराव यांना आनंदी दीर्घायुष्य लाभावे याच व्हॅलेंटाईन - डे निमित्त सदिच्छा...
=============================
Comments
Post a Comment