अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार 'साम' टीव्हीच्या सोनाली शिंदे यांना जाहीर

३१ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे आयोजन : शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव


अंबाजोगाई - संपादक रणजित डांगे

(लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्कार यंदा 'साम टीव्ही' च्या सोनाली शिंदे (मुंबई) यांना जाहीर झाला असून दि. ३१ जानेवारी बुधवार २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यासोबतच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा देखील याच दिवशी होणार असल्याची माहिती अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय वृत्तपत्र सृष्टीत अगणित योगदान आहे. त्यांच्या प्रखर व तेजस्वी लेखणीने भारतीय लोकशाही अधिक मजबूत झाली. अशा महामानवाने 'मूकनायक' हे वृत्तपत्र ३१ जानेवारी १९२० रोजी उपेक्षित, शोषित, पिडीतांसाठी समर्पित केले. त्या निमित्ताने अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने ३१ जानेवारीला दरवर्षी 'मूकनायक' दिनाचे आयोजन करण्यात येते. 

'मूकनायक' दिनानिमित्त देण्यात येणारा 'मूकनायक' पुरस्कार यंदा 'साम' टीव्ही च्या सोनाली शिंदे (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. सोनाली शिंदे या गेली दहा वर्ष मीडियात काम करत असून सध्या 'साम' टीव्हीमध्ये काम करतात. 'साम' मध्ये त्या इनपुट विभागात कार्यरत असून स्पेशल रिपोर्टींग करतात. 'सकाळ इन्व्हेस्टीगेशन टीम ', 'तरुण भारत' अशा प्रिंट माध्यमांमध्ये, तसेच 'महाराष्ट्र वन', 'TV9 , 'साम' अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांच्या बातम्यांना 'Red Ink' आणि 'लाडली' अशा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रिंट माध्यमांत असताना त्यांच्या बातम्यांची विधानभवनात चर्चा झालेली आहे. महानगरपालिका ते लोकसभा निवडणुका, बजेट, सुप्रीम कोर्टातील महत्त्वाच्या सुनावणी, उत्तरप्रदेश निवडणूक त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. सोशल मीडिया आणि राजकारण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे 'पॉलिक्लिक - मत तुमचं, मेंदू कुणाचा' हे पुस्तक प्रकाशित झाले असून, अल्पावधीत त्याच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या पुस्तकाच्या किंडल आवृत्तीचेही प्रकाशन झाले आहे. त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत 'मूकनायक' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल तसेच विविध परिक्षेत, विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे. यामध्ये ऋजुता संदीपान ठोके, पुजा विजयकुमार सुर्यवंशी, श्रीनिवास घनघाव, स्नेहा सतिष परदेशी, अक्षयकुमार पवार, करण विश्वनाथ चव्हाण, जय बालाजी महिला बचत गट, स्वावलंबी महिला बचत गट यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 


'मूकनायक' दिनाचा हा कार्यक्रम नगरपरिषदेच्या स्व.विलासराव देशमुख सभागृहात ३१ जानेवारीला बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे, सचिव गणेश जाधव, संघाचे ज्येष्ठ सदस्य जगन सरवदे, प्रा. प्रदिप तरकसे, परमेश्वर गित्ते, दादासाहेब कसबे, रोहिदास हतागळे, धनंजय जाधव, संभाजी मस्के, विश्वजीत गंडले, प्रवीण कुरकूट, रविंद्र अरसुडे, दत्ता वालेकर, रतन मोती यांच्यासह आदी सदस्यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)