छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्माचे रक्षण केले - ह.भ.प.शिरीष महाराज मोरे
दीनदयाळ बँकेची युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला ; वर्ष 22 वे
=======================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प.शिरीष महाराज मोरे यांनी "शिवराज्याभिषेकाची 350 वर्षे" या विषयावर आपले मौलिक चिंतन मांडले.
कार्यक्रमाची सुरूवात भारतमाता, स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. बॅंकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते ह.भ.प.शिरीष महाराज मोरे, बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, संचालक सर्वश्री रा.गो.धाट, इंजि.बिपीन क्षिरसागर, मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर, प्रा.जयकरण सुरेशकांबळे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी व मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम पुष्प गुंफताना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान 11 वे वंशज ह.भ.प.शिरीष महाराज मोरे (देहु) यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारत देशाचा प्राण आहेत. महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. जर शिवराय नसते तर हिंदू समाज व संस्कृती ऱ्हास पावली असती, त्यामुळे शिवरायांच्या उपकारातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. ह.भ.प.मोरे महाराज यांनी हिंदवी स्वराज स्थापन होण्यापूर्वीची पार्श्वभूमी, परस्थिती, इस्लामी राजवटीचे आक्रमण, त्यांची कार्यपद्धती, धर्मांतरण, महिलांवरील अन्याय अत्याचार, हिंदूंची 30 ते 35 हजार मंदिरे पाडून तत्कालीन समाज मनावर निर्माण केलेली दहशत, इस्लामी राजवटीला विरोध करण्यासाठी सक्षम नसलेला तत्कालीन समाज आणि समाज नेतृत्व, सर्वत्र माजलेली अनागोंदी, लुट अशा काळात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या संस्कारांच्या बळावर आणि अठरापगड जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. शेती सुधारणा, कला संस्कृतीचे जतन, शेतकरी, कष्टकरी यांना न्याय दिला. महिलांचे रक्षण केले. स्वराज्यात न्याय व्यवस्था, अष्टप्रधान मंडळ, सागरी सिमेच्या रक्षणासाठी आरमार उभारणी, राजमुद्रा निर्मिती, स्वभाषेत राज्य कारभार, भाषा शुद्धीकरण, धर्म प्रतिष्ठापना, मंदिरांचा जीर्णोद्धार, प्रखर राष्ट्रवाद, रयतेचे कल्याण केले. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे मुळ शिवचरित्रात सापडते. असे सांगून शिवचरित्राचे अंतरंग समजून घ्यावे, हिंदू समाजासमोर खरा इतिहास आणला पाहिजे, खोटा इतिहास खोडून काढा. नाहीतर पुढील पिढ्यांमध्ये स्वाभिमान उरणार नाही. अशी भितीही ह.भ.प.मोरे महाराज यांनी व्यक्त केली. प्रारंभी प्रास्ताविक करताना दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष अॅड.मकरंद पत्की यांनी सांगितले की, "विश्वास, विकास आणि विनम्रता" या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत दीनदयाळ बँकेने 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 500 कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. या वर्षीच्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक परिवार म्हणून काम करताना उत्तम टीमवर्क करून नुकताच 503 कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. एकूण व्यवसायाचा 825 कोटींचा पल्ला ही गाठला आहे. 31 मार्च 2024 अखेरपर्यंत 1000 कोटी रूपयांच्या व्यवसायाचे लक्ष बँकेने समोर ठेवले आहे. लवकरच ते ही साध्य होईल. आर्थिक क्षेत्रात कार्य करीत असताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे आपण काही देणे लागतो. याच जाणिवेने स्थापनेपासून व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी देण्याचे काम दीनदयाळ नागरी सहकारी बँक अव्याहतपणे करीत आहे. या उपक्रमाचे हे 22 वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत आजपावेतो सदर व्याख्यानमालेत अनेक थोर विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक, पत्रकार, अर्थतज्ज्ञ, इतिहास संशोधक, अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी रसिकांसमोर आपले अनमोल विचार मांडलेले आहेत. असे बँकेचे अध्यक्ष अॅड.मकरंद पत्की यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय बँकेचे संचालक मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन ओंकार कुलकर्णी यांनी केले. उपस्थितांचे आभार अनंत देशपांडे यांनी मानले. विश्वजीत धाट यांनी पद्य सादर केले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी अंबाजोगाईतील विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक, रसिक श्रोते उपस्थित होते. आयोजित व्याख्यानमालेत गुरूवार, दि.11 जानेवारी रोजी डॉ.पांडुरंग बलकवडे (पुणे) यांचे ‘लोककल्याणकारी शिवराय व त्यांची राजनीती’ या विषयावर व्याख्यान होईल. बँकेच्या वतीने दि.11 जानेवारी रोजी सहकार भारती स्थापना दिवस ही साजरा करण्यात येईल. या प्रबोधनपर व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवार, दि.12 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा व्याख्याते राहुल सोलापूरकर (पुणे) यांच्या ‘श्रीराम जन्मभूमी - इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. 12 जानेवारी रोजी युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची जयंती बँकेच्या वतीने साजरी करण्यात येईल. तरी अंबाजोगाई शहर व परिसरातील रसिक, श्रोते, नागरिक, माता, भगिनी आणि युवक वर्गाने सहकुटूंब, सहपरिवार उपस्थित राहून युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.
==================================
Comments
Post a Comment