गावचे नंदनवन करण्यासाठी उंदरी ग्रामस्थ सरसावले ; 10 हजार वृक्ष लागवडीचा केला निर्धार





भाजप नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन

========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे 

(लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

काळाची गरज ओळखून, संत तुकाराम महाराज यांचा पर्यावरण विषयक "वृक्षवल्ली आम्हा सोयरे- वनचरे..!" हा दृष्टा संदेश आचरणात आणण्याच्या व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून गावातील काही जाणत्या आणि दृष्ट्या व्यक्तींनी वृक्ष लागवड अभियानाची संकल्पना मांडली आणि पाहता - पाहता त्या अभियानास ग्रामपातळीवर सर्वस्तरांतून लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. ही किमया केली आहे, केज तालुक्यातील 'उंदरी' या गावाने. वृक्ष लागवडीेतून गावात नंदनवन फुलविण्यासाठी लोकसहभागातून दहा हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प बीड जिल्ह्यातील उंदरी ग्रामस्थांनी केला असून या मोहिमेचा शुभारंभ रविवारी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.



भाजप नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबेजोगाई येथील मानवलोक संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया हे होते. राहुल सोनवणे, ॠषिकेश आडसकर, एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे बीड जिल्हा प्रतिनिधी गोविंद शेळके, पशुपतीनाथ दांगट, डॉ.भगवानराव ठोंबरे, सहयोगी अधिष्ठाता व लातूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, शिवाजी ठोंबरे यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. मराठवाडा हा प्रदेश कमी पर्जन्यमानासाठी देशात ओळखला जातो, येथे जंगलाचे आच्छादन खूपच कमी आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा प्रदेश दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याने 4,000 लोकसंख्या वस्ती असलेल्या उंदरी गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावात वृक्ष लागवड गतिमान करण्याचा निर्णय घेतला. याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात 1000 वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते रविवारी करण्यात आली. आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथून चिंच, वड, पिंपळ आणि इतर अनेक प्रजातींची झाडे आणण्यात आली असून भविष्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी चिंचेची झाडे रस्त्याच्या कडेला आणि शेताच्या बांधावर लावली जातील. प्रत्येक झाडाला सुरक्षेसाठी जाळी आणि ज्याच्या हस्ते झाड लावले आहे. त्या व्यक्तीच्या नांवाची पाटी असेल, असे डॉ.भगवानराव ठोंबरे यांनी सांगितले. तर रमेशराव आडसकर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात लोकसहभागातून वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचे कौतुक केले. सध्या माणुस मर्यादित जीवन जगत आहे, मात्र या मर्यादा ओलांडून गावाला नविन ओळख देण्यासाठी गावकऱ्यांनी पाऊल उचलले आहे, असे सांगून गावाच्या विकासासाठी कधीही मदतीचा हात पुढे करू, असे आश्वासन त्यांनी दिले. राहुल सोनवणे म्हणाले की, गावात एक वेगळंच चित्र पाहायला मिळत असून, नवी क्रांती होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी झाडे लावणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही ही चळवळ जिल्हाभरात सुरू करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. वातावरणातील बदल हे निसर्गामुळे नव्हे तर मानवाकडून मोठ्या प्रमाणावर झाडे तोडल्यामुळे झाला आहे. झाडे लावली तर ऑक्सिजन मशीन घेण्याची गरज पडणार नाही, असे अनिकेत लोहिया यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी प्रास्ताविक करून वृक्ष लागवडीचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले की, वृक्ष ही त्याग समर्पण आणि दातृत्वाचे प्रतीक असतात. ते सर्व सजीवांना सावली, फळे व ऑक्सिजन देतात त्याचप्रमाणे वातावरणातील प्रदूषण कमी करून तापमान ही नियंत्रणात ठेवतात. माणसाला २४ तासांत १६ किलो ऑक्सिजनची गरज असते. एक झाड प्रतिदिन ०४ किलो ऑक्सिजन निर्माण करते आणि एक झाड एका वर्षात ३ किलो कार्बन डायऑक्साइड नष्ट करते. तथापि, झाडे आपल्यासाठी फायदेशीर आहेत कारण, ते पाण्याचे स्रोत तयार करतात आणि पृथ्विवरील हवामान संतुलित करतात. तसेच वृक्ष हे मानवी विचारांचे ही प्रदूषण नष्ट करतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत कुरवाडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रमोद ठोंबरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बिभीषण ठोंबरे, बालासाहेब कसबे, बापुराव सोनवणे, आत्माराम पांचाळ, बाबूराव फामडे, विश्वनाथ ठोंबरे, रवी ठोंबरे, भागवत ठोंबरे, शंकर ठोंबरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण उत्तमराव ठोंबरे, शिवाजी ठोंबरे आदींनी परिश्रम घेतले.


=========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)