लोकगायक आबाजीराव तायडे (अण्णा): एक समृद्ध पर्व
सुप्रसिद्ध नाट्यकर्मी, कलावंत, लेखक प्रा.डॉ.सिद्धार्थ आबाजी तायडे यांचा लेख
============================================
"महात्मा बुद्ध - शिवराय -फुले - शाहू - डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे क्रांतीदर्शी विचार जनमानसात पोचविणारे लोकगायक तथा सेवानिवृत्त तंत्रज्ञ आमचे वडील स्मृतिशेष आबाजीराव तायडे (अण्णा) यांचा २९ एप्रिल स्मृतीदिन. त्या निमित्ताने या समृद्ध पर्वाचा अर्थातच अण्णांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न..."
(संपादक रणजित डांगे - लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
संपर्क क्रमांक - 9403927527
**************************************************
आपल्या देशात सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधन करणाऱ्या मंडळींची मोठी परंपरा आहे. आपल्या परिवर्तनीय गायकीतून समाजमनाला जागृत करण्यासाठी १९६५ साली "समाज सुधारक गायन मंडळ" स्थापन झाले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आंगलगाव (ता.जि.परभणी) येथे लोकगायक स्मृतिशेष आबाजी मेसाजी तायडे, यादव कांबळे, ज्ञानोबा कांबळे, देविदास नाटकर, लिंबाजी मस्के, वामन कांबळे, हरिभाऊ कांबळे, रंगनाथ कांबळे, गंगाराम साबणे, शेषेराव साबणे, मुंजाजी कांबळे, पिराजी कांबळे, त्र्यंबक तायडे, लक्ष्मण तायडे, अशोक कांबळे, साहेबराव तायडे, या सर्व समविचारी उपासकांच्या साथीने "समाज सुधारक गायन मंडळाची उभारणी केली. समाजाचे अंतरंग उजळण्यासाठी या सर्व भीमसैनिकांनी सांस्कृतिक चळवळ सुरू केली. महाराष्ट्रभर बुद्ध - भीम गीतांचे जोशपूर्ण सादरीकरण केले. उपजत कलात्मक ज्ञानाचा कसला ही अभिनिवेश न बाळगता समाजातील अशिक्षित, अल्पशिक्षित, श्रमिक, कष्टकरी लोकांचं प्रबोधन केलं. या गायन मंडळात प्रमुख गायक म्हणून कालकथीत आबाजीराव तायडे, यादव कांबळे तसेच हरिभाऊ कांबळे, त्र्यंबक तायडे हे उत्कृष्ठ ढोलकीपटू पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. यादव कांबळे, मुंजाजी कांबळे हार्मोनियम, देविदास नाटकर झांज, लिंबाजी मस्के कडीवादन करायचे तर गंगाराम साबणे, शेषराव साबणे साथ- संगत करायचे. ज्या कुटुंबात शिक्षणाचा गंध नाही, अशा कुटुंबात आबाजी तायडे (अण्णा) यांचा जन्म ०३ ऑगस्ट १९५० रोजी परभणी जिल्ह्यातील आंगलगाव येथे झाला. (मूळगाव बोंदरगाव ता.परळी, जिल्हा बीड). ज्या कालखंडात त्यांचा जन्म झाला, तो काळ सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि स्वातंत्र्योत्तर चळवळीने भारलेला होता. महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महाराजे सयाजीराव गायकवाड, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीने संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला होता. अशा काळात आबाजी तायडे यांचे बालपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत झाले. परिस्थितीशी दोन हात करीत, मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेतले. ७० वर्षांच्या समग्र जीवनप्रवासात त्यांची पत्नी आमची आई सत्यभामा आबाजी तायडे यांनी, मोठया धैर्याने त्यांना साथ दिली. अण्णांच्या वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात आईंनी सर्वांना एकोप्याने सांभाळले. आई - अण्णांनी कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पेलत घराला आधार दिला. आम्हां बहीण - भावंडांना वाढविले. शिक्षण देऊन सन्मानाचे जीवन दिले. बहीण सुनिता भगवान जगताप कुटुंब संगोपन आणि धम्म कार्यात सहभागी असतात. बंधु विष्णू तायडे विद्युत विभागात ऑपरेटर म्हणून सेवा बजावत आहेत. धाकटे बंधु राहुल तायडे विद्युत विभागात सक्रियपणे कार्यरत आहेत. आई - अण्णांच्या संस्काराने मी शैक्षणिक - सामाजिक - सांस्कृतिक क्षेत्रात प्रामाणिकपणे उभा आहे. आज आम्ही जे काही आहोत ते केवळ आई - अण्णां मुळेच. नातवंडे म्हणजे दुधावरील सायीप्रमाणेच..! नातवंडे अंगा - खांद्यावर खेळविणारे, सुना लेकीप्रमाणे सांभाळणारे कुटूंबवत्सल अण्णा सदोदित आमच्या ह्रदयात राहतील. आमचे बंधू मार्गदर्शक - साहित्यिक प्रोफेसर डॉ.संजय जाधव यांच्याविषयी ते अभिमानाने बोलत. आमच्या मित्रांवर निरपेक्ष प्रेम करणारे अण्णा, बालासाहेब इंगळे, भीमयुगकार रानबा गायकवाड, राजू डापकर, शंकर सिनगारे, बबन मस्के, अनिलकुमार साळवे, लहू कांबळे, संतोष पोटभरे, तानाजी चौरे, विनोद लांडगे,बा.सो.कांबळे, प्रदिप भोकरे, अरूण सरवदे, चंद्रकांत जोगदंड, स्वप्नील सिध्दांती, मदन ईदगे, मिलिंद मस्के आदि असंख्य स्नेही - सन्मित्रांना अण्णांनी जीव लावला. अस्तित्वाच्या जाणिवेच्या ठिणगीचे एका तेजोमय प्रकाशात रूपांतर करून वंचित घटकांमध्ये लढण्याची जिद्द व समता निर्माण करणे आंबेडकरी चळवळीचे मुख्य उद्देश राहिला आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांनी, लोककवी - गायकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार व मुल्यातून प्रेरणा घेऊनच कार्य केले आहे. याच प्रेरणेतून स्मृतिशेष आबाजीराव तायडे व सहकारी यांनी समाज सुधारक गायन मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ उभी केली. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तेजाचे एक वलय निर्माण केले. ज्याच्या किरणांनी अनेक कवी - गायक, जलसाकार, लेखक, समीक्षक व विचारवंत विविध वैचारिक क्षेत्रांमध्ये निर्माण झाले. काहींनी इतिहासातील दलितांचे शौर्य, कर्तबगारी बौद्धिक संपत्ती यावर संशोधन सुरू केले तर लोककवी वामनदादा कर्डक सारख्या भीमशाहिरांनी आंबेडकरी विचार जनमानसात रूजविण्यासाठी प्रयत्न केले. यात आमचे वडील स्मृतिशेष आबाजीराव तायडे व सहकारी यांच्या समाज सुधारक गायन मंडळाचेही भरीव योगदान आहे. आत्मसन्मान आणि सत्तासंघर्ष याची सुरूवात संगीत आणि गाण्यांमधून होणाऱ्या सांस्कृतिक रूढींचा विरोध आणि उठाव यातून होताना दिसून येते. गाण्यांमधून व संगीतामधून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि त्यात असणाऱ्या भावनांना जागृत करण्याची क्षमता ही दलित लढा सातत्याने सुरू ठेवण्या साठीचे शक्तीस्त्रोत ठरले आहे. आंबेडकरी जलसा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आंबेडकरी दलित रंगभूमी ही देखील वंचित समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेसाठी उत्प्रेरक ठरली आहे. याची सुरूवात आंबेडकरी संमेलनातून होऊन टप्प्याटप्प्याने लोकनाट्य, पथनाट्य यातून प्रगत झाले. लोकशाहीर वामनदादा कर्डक या प्रख्यात शाहीरांनी लिहिले आहे, “तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे" ही सर्व गाणी साधी पण, शक्तिशाली होती. तरीही, यापैकी बहुतेक लोककलावंत लोकप्रियता प्राप्त नाहीत कारण प्रसिद्धी मिळविणे हा त्यांचा उद्देशच नसतो. तथापि, जनतेवर आणि महाराष्ट्रात विवेकबुद्धी निर्माण करण्याचा त्यांचा प्रभाव अफाट आहे. त्यांच्या गाण्यांसह, शाहीर लोकांपर्यंत पोहोचले. शाहीर कर्डक यांचा जलसा पाहून परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की, "माझ्या दहा सभा व मेळावे आणि लोककवी वामनदादा कर्डक यांचा एक जलसा समान आहे.” बहुजन समाजातील कलाकारांनी बहुजनांच्या प्रबोधनासाठी सादर केलेली कलाकृती म्हणजे जलसा असं त्याचं स्वरूप होतं. समाजातील परिस्थितीचं वर्णन करून लोकशिक्षण, मनोरंजन असं त्याचं स्वरूप होतं. तत्कालीन काळात प्रस्थापितांच्या दडपणाखाली हलाखीचं जीवन जगणाऱ्या बहुजन समाजाला जागं करणं, विचार करायला लावणं हे त्याचं उद्दिष्ट होतं.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक लढाईस लोककवी - गायकांनी लेखन - गायनाने बळकटी दिली आहे. प्रसिद्धीपासून कायमच अलिप्त राहून, झगमगाटाला न भुलता साधेपणाने व प्रामाणिकपणे आयु.आबाजीराव तायडे यांनी १९६५ ते १९८० या काळात वंदनीय महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्यातून व लोककवी वामनदादा कर्डक यांचा आदर्श समोर ठेवून बुद्ध-भीम गीतातून प्रबोधन कार्य केले.
गिरवली सबस्टेशन बुध्द विहार समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव, पंचशील बुद्ध विहार आणि सम्राट अशोक विचार मंच, परळी वैजनाथ जिल्हा बीड यांच्या माध्यमातून त्यांनी धम्मकार्य केले . १९८० ते २०१० दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात तंत्रज्ञ म्हणून सेवा केली. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या नाट्य स्पर्धेत सहभागी होत नेपथ्य व प्रकाश आयोजनात सक्रिय असत. त्यांच्या रंगभूमीवरील संचारामुळेच मलाही प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले .ज्येष्ठ साहित्यिक - संपादक भीमयुगकार रानबा गायकवाड लिखित आणि प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित 'भीमयुग' या नाटय निर्मितीत त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले."गुणवंत तंत्रज्ञ " म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या वतीने त्यांचा सेवा गौरवही करण्यात आला. मला अण्णा मधील अनेक गोष्टी आवडतात, माणसाचं वैभव त्यांनी गोळा केलं. रक्ता पलीकडील कितीतरी नाती त्यांनी तयार केली. ती नाती जोपासली. आमच्या आई - अण्णांचं जे माणसं लाभण्याचं भाग्य आहे ते आपसूकच माझ्या वाट्याला आलं आहे.
प्रिय अण्णा, तुमच्या त्यागाला, परिश्रमाला आम्ही शब्दांत मांडूच शकत नाहीत. तुमचं असणं हे आमच्यासाठी सर्व काही होतं...ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं...आज सर्व काही असण्याची जाणीव आहे...पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे...आपुलकी व माणुसकी या गोष्टींची ज्यावेळी चर्चा होईल,त्यावेळी सर्वात अगोदर अण्णा तुमची आठवण येईल. व्यक्ती जन्म घेतो त्या व्यक्तीचे हे जग सोडून जाणे अटळ आहे. म्हणजेच ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू सुद्धा आहे. पण, अलीकडे आपण एका माणुसकी हरवलेल्या जगामध्ये जगत आहोत. प्रत्येकाला एक दिवस मरणाला सामोरे जावे लागणार आहे.हा निसर्गाचा नियमच आहे. तो कोणाला चुकलेला नाही. परंतु, जीवन जगत असताना आपण आपल्या हातून कोणाचेही मन दुखावले जाऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या सहवासात असणारा प्रत्येक व्यक्ती एक दिवस आपल्या पासून दूर निघून जाणार आहे. ही भावना मनात ठेवून आपण त्यांच्याशी आपुलकीने वागले पाहिजे. हीच शिकवण आपण आम्हाला देऊन गेलात.
वडील आणि सूर्य यात एक साम्य आहे दोघांच्या नसण्याने आपल्या आयुष्यात अंधार होतो. तुमच्या निधनाने हातात हात घेऊन चालणारी प्रेरणा हरपली ! तुमचे संस्कार आणि विचार घेऊनच जीवन पथावर चालत राहू. "अंधाऱ्या रात्रीतून सूर्य उगविण्याची बात करू, संकटांशी मित्रा धीराने दोन हात करू...काल सुख आज दुःख दोघांना आबाद करू.. वादळे - तुफान येतील, छाती पोलाद करू...पराजयाची भीती नको, शत्रुवर प्रहार करू, सारे एकजुटीने पुन्हा, नवा एल्गार करू, आपुलकीने माणूसकीचा ,नवा गाव उभारू...."अशीच प्रेरणा देऊन गेलात. प्रिय अण्णा, आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच आम्हाला शिकवले...दिवसरात्र कष्ट करून, स्वतःच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले. ज्यांच्यामुळे आमची ओळख आहे ते म्हणजे आमचे आदरणीय 'अण्णा'...!तुम्ही आमच्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमी आमच्या सोबत होतात नेहमी असेच आमच्या पाठीशी रहा.
श्रद्धेय अण्णा, तुम्ही अपार कष्ट सोसले, स्वसुख भोगायचे राहून गेले, रंजल्या - गांजलेल्यांना जीव लावला, सर्वांच्या कल्याणासाठी देह झिजविला ! क्षणोक्षणी आता तुमचीच आठवण येते...जीवलग लोकांच्या दूर जाण्याने डोक्यावरच छप्पर नाहीसं होतं आणि पायाखालची जमीन सरकते. दु:खाचा डोंगर कोसळतो. जीवन जितकं सुंदर आहे तितकच ते दु:खद सुद्धा आहे. आपल्या आयुष्यात येणार्या दु:खाला आपण धैर्याने सामोरं गेलं पाहिजे, कारण दु:ख ही सुखाची दुसरी बाजू आहे. खरंच जीवन जितकं सुंदर आहे तितकच ते वाईट पण आहे. असं वाटतं आपल्या प्रिय लोकांनी आपल्याला कधीच दूर सोडून जाऊ नये, पण निसर्गाच्या पुढे कुणाचे काही चालत नाही. कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे. हे चार दिवसांचे आयुष्य आपण खूप आनंदाने जगलं पाहिजे. आपल्या आयुष्यात आपण इतरांचा तिरस्कार कधीच केला नाही पाहिजे इतरांच मन अजिबात दुखावलं नाही पाहिजे. आपल्या व इतरांच्या आयुष्यावर प्रेम केलं पाहिजे, खर्या अर्थाने चांगला माणूस म्हणून जगलं पाहिजे. हीच शिकवण अण्णा तुम्ही आम्हाला दिली. २९ एप्रिल २०२१ रोजी अण्णांनी जगाचा निरोप घेतला.
आयुष्यभर तुमच्या सहवासाची उणीव मात्र भासत राहील. तुम्ही आम्हाला एवढं प्रेम दिलं की ते प्रेम, प्रेम करणाराचा समजू शकतो. तुमचं प्रेम आणि तुमचे आशिर्वाद सदैव आमच्यासोबत असतील. सदैव स्मरणात ! पुण्यस्मरणानिमित्त कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली..!
🙏🏵️🏵️🙏
✍ प्रा.डॉ.सिद्धार्थ आबाजी तायडे
(पंचशील नगर, परळी वैजेनाथ जि.बीड.)
मो.९८२२८३६६७५
=======================================
Comments
Post a Comment