नाट्यशिल्पी आसेफ अन्सारी (शेख) यांची बालरंगभूमीस अनोखी 'भेट'
=======================================
मुंबई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेतर्फे बालरंग भूमीचे प्रतिभावंत नाटककार, बालरंगभूमी परिषद राज्य समन्वयक बृहन्मंबई व छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यवाह, अक्षर मानव एकांकिका विभागाचे राज्य उपाध्यक्ष , नाट्यशिल्पी आसेफ अन्सारी (शेख) लिखित - दिग्दर्शित 'भेट' या बालनाट्याचा प्रयोग संपन्न झाला.
रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषेत हा प्रयोग सादर झाला. या अभिनव आणि ऐतिहासिक नाट्य प्रयोगास प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकर, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती निसळ सिने बालकलाकार विनायक पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या छोट्या दोस्तांना कार्टून्सचं प्रचंड आकर्षण आहे. नेमकं हेच गुपित हेरून बालरंगभूमी वरील सशक्त नाटककार आसेफ शेख (अन्सारी) यांनी नात्यांची अनोखी भेट आपल्याला दिली आहे. 'भेट' या बालनाट्यातून हळुवार उलगडत जाणारी पालकांना अंत:र्मुख करणारी एक गोष्ट मांडली आहे. भौतिक सुख साधनांच्या पलीकडील आनंदाची परिसीमा काय आहे. कौटुंबिक विघटनाचे भावस्पर्शी दर्शन आसेफ अन्सारी (शेख) यांनी घडवले आहे. बालरंगभूमी चैतन्यमय करण्यासाठी प्रयत्नशील असणारे राज्य शासन पुरस्कार प्राप्त नाटककार आसेफ अन्सारी - शेख यांच्या लेखन - दिग्दर्शनातून बाल रंगभूमीवर प्रथमच असा प्रयोग झाला आहे. जो तीन भाषेत सादर करण्यात आला. या बालनाट्याचे सादरीकरण करणारे बाल कलाकार निषाद दांडेकर व मुग्धा शेलार यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य बालनाट्य स्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक मिळाले आहे. लक्ष्मी, आराध्य, अर्णव झापडेकर, अश्विका झापडेकर आदी कलावंतांनी नाटकात अभिनयाने रंग भरले. सदरील प्रयोग बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेचा बाल प्रेक्षक सभासद व बालकलाकार सभासदांसाठी नि:शुल्क होता. बालनाट्याची तांत्रिक बाजू संगीत - रूही वर्तक, नेपथ्य - देवू माळकर, प्रसाद खडके, प्रकाश योजना - अभिजीत भातलवंडे, गोकुळ गायकवाड, रंगमंच व्यवस्था - सायली लांडगे, राज तळेकर, सिद्धार्थ गायकवाड, साहिल नारकर, रंगभूषा - पल्लवी दांडेकर, वेशभूषा - मनिषा शेलार आदींनी सांभाळली. हा ऐतिहासिक बालनाट्य प्रयोग सादर करून आसेफ अन्सारी शेख यांनी मराठवाडा रंगभूमीची मान उंचावली आहे. भेट नाटकातील बाल कलावंतांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बाल प्रेक्षकांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
===============================================
Comments
Post a Comment