बारवांचे पुनरूज्जीवन व संवर्धन काळाची गरज - लेखक मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी
आज बारवांना गतवैभव प्राप्त करून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे
==========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
बारव संवर्धन - महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची, समाज सुधारकांची भूमी आहे तशीच ती गड किल्ल्यांची, बारवांची भूमी आहे. ऐतिहासिक वारसा सांगणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. परंतु, आज बारवांना गतवैभव प्राप्त करून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. बारव स्थापत्य हे महाराष्ट्रातील एक जाणीवपूर्वक विकसित केलेले शास्त्र आहे. त्या - त्या काळात स्थापत्याने बारव निर्मितीसाठी अतिशय अचूकपणे जलस्त्रोत शोधले होते. प्रामुख्याने सातवाहन काळापासून बारवांची निर्मिती झाली. बारवाचा उपयोग जलसंचय करण्यासाठी केला जात होता. प्रामुख्याने आठव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत बारव निर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु पुढे 14 व्या शतकाच्या पुढे बारवांची निर्मिती थांबली. परंतु, बारव हे चौदाव्या शतकापर्यंत अत्यंत चांगल्या स्थितीत होते. प्रामुख्याने बारव हे मंदिर, तलाव व जंगलात पाण्याच्या संचयासाठी बारवाची निर्मिती केली गेली. 14 ते 18 व्या शतकापर्यंत बारवाची निर्मिती कमी झाली. बारवाची पडझड झाली. त्यांचा उपयोग कचराकुंडी म्हणून केला जाऊ लागला. पुढे लोकसंख्या वाढत गेली तशी बारवाची गरज वाढू लागली. म्हणून अठराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बारवाचे पुनरूज्जीवन केले व नवीन बारवाची निर्मिती केली. त्यांच्या काळात बारव निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. बारवाचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा प्रयत्न केला. पण, पुढे काळानुरूप पाणी व्यवस्थापन बदलले महाराष्ट्रात पूर्वी साधारण 50 हजार बारव होते. परंतु, काळानुरूप त्यांची पडझड झाली. कचरा कुंड्या झाल्या पारंपारिक जलस्त्रोत बुजवले गेले. त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कमी झाले. लोकांना नळाद्वारे पाणी मिळू लागले. तेव्हा आड, विहिरी, बारव यांची कचराकुंडी झाली. पूर्वी गावातील पाणी गावातच मुरवल्या जायचे गावातील तहान गावातच भागत असत. परंतु, ती हळूहळू लोप पावली. पूर्वी ज्याप्रमाणे नदी मातृक संस्कृती आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याची बारव मातृक संस्कृती होती. मराठवाड्यातील गावाचा पाण्याचा प्रश्न आड, विहिरी, बारव यांच्या सह्याने मिटू लागला. परंतु, ही संस्कृती लयास जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आज महाराष्ट्रात जवळपास 20,000 बारव आहेत. त्या - त्या काळातील ऐतिहासिक महत्त्व ते विशद करतात. परंतु, आज मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई होऊ लागली. तेव्हा बारवाची पुनर्जीवन करण्याची गरज आहे. मानवाला वाणी आणि पाणी फुकट मिळाले म्हणून त्यांचा वारेमाप वापर केला. त्याचा परिणाम पाण्यासाठी महायुद्ध होईल की काय अशी भीती आहे. त्या काळात बारावाची निर्मिती करताना पुनर्भरणाच्या दृष्टीने गावाच्या परिसरात जलाशय असायचे. वाढत्या नागरिकीकरणामुळे जलाशय नष्ट होत गेले. परिणामी बारवाचे पुनर्जीवन अवघड होत गेले. आज पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी बारवाचे पुनर्जीवन करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रामुख्याने बारवाचा अभ्यास करत असताना असे लक्षात येते की आज ही महाराष्ट्रात अत्यंत ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा बारवाच्या रूपाने जपण्याचा प्रयत्न केला जातो. काही लोक त्यासाठी प्रयत्न करतात. या बारवाच्या पुनर्जीवनासाठी राजाश्रय आवश्यक असतो.शासन स्तरावर हा निर्णय होणे गरजेचे आहे. म्हणून योगेश्वरी शिक्षण संस्थेतील जय हिंद ग्रुपने पुढाकार घेऊन राम कुलकर्णी (प्रवक्ते भाजप) व आमदार प्रा.राम शिंदे यांच्यामार्फत मंत्री महोदय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन दिले. संवेदनशील मन असणाऱ्या सुधीर भाऊंनी ताबडतोब त्यामध्ये रस दाखवून त्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली व बारवाचा हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पुढाकार घेतला व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बारवाचे पुनर्जीवन केल्यानंतर आत्ताच म्हणजे जवळपास 200 वर्षांनी हा प्रश्न महाराष्ट्र शासनाने हाती घेतला व बारवाचे पुनर्जीवन करण्याचा निर्णय घेतला. या योजनेला "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बारव पुनर्जीवन योजना" कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनीच बारवाची निर्मिती व पुनर्जीवन केले होते. प्रायोगिक तत्त्वावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रातील 75 बारवांचे पुनर्जीवन सुशोभीकरण करून लोकांना बारवाचे महत्व लक्षात यावे म्हणून व पाण्याचा पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी पारंपारिक जलस्त्रोतांचे पुनर्जीवन करून पाण्याचा संचय महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न आहे. बारव हे प्रामुख्याने मंदिर, किल्ले, जंगल या ठिकाणी आढळतात. आज महाराष्ट्रात जवळपास 20 हजार बारवांची संख्या आहे. त्या बारवातील गाळ काढणे, प्लास्टिक पासून मुक्ती देणे, बारवाची स्वच्छता करणे बारावाचे पुनर्जीवन करून पूर्वीप्रमाणे त्याचे संगोपन करणे व पावसाची पाणी त्या ठिकाणी साचवणे.
बारवाचा अभ्यास करत असताना बारवाचे चार प्रकार आढळतात. 1.) नंदा बारव- ज्या बारवाला एकच प्रवेशद्वार आहे आणि तीन टप्पे आहेत. त्यांना नंदा बारव असे म्हणतात., 2.) भद्रा बारव- दोन प्रवेशद्वार आणि सहा टप्पे यांना भद्रा बारव म्हणतात., 3.) जया बारव - तीन प्रवेशद्वार व नऊ टप्पे., 4.) विजया बारव चार प्रवेशद्वार आणि बारा टप्पे या बारवाचा आकार शिवपिंडाप्रमाणे असतो., 5.) एल झेड यु टी आकाराचा बारव- चौरस आणि आयताकृती बारव., 6.)स्क्रू आकाराच्या पायऱ्या असणारा बारव., 7) तलवार आकाराचा बारव- अशाप्रकारे बारवाचे प्रकार पडतात. आज बारव हा ऐतिहासिक स्थापत्य कलेचा ठेवा जतन करणे, त्या परिसरात स्वच्छता करणे, त्या ठिकाणी बारवाच्या आजूबाजूस वनराई निर्माण करणे, बारवाच्या पुनर्जीवनामुळे पर्यटन व्यवस्था विकसित होईल व पाण्याचा थेंब अडवणे, जिरवणे, मुरवणे यासाठी बारवातील गाळ काढून त्याचे पुनर्जीवन होणे गरजेचे आहे. पूर्वी बारवाची निर्मिती करताना त्याच्या पुनर्भरणाच्या दृष्टीने गावाच्या परिसरातच जलाशय असायची. त्यामुळे गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्न गावातच सुटायचा. परंतु, पुढे वाढत्या नागरिकीकरणामुळे बारवाच्या कचराकुंड्या झाल्या. लोक त्या बारव, आड, विहिरी मध्ये कचरा प्लास्टिक टाकू लागले. लोकांना श्रम नको वाटू लागले. परंतु पुढे येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी पारंपारिक जलस्त्रोताचे पुनर्जीवन करावे लागेल. जेणेकरून पाण्याचा प्रश्न गावातच मिटण्यासाठी मदत होईल. आज पाणीटंचाई दूर करण्यासाठी पारंपारिक जलस्त्रोतांची पुनर्जीवन करावे लागेल लोकसहभाग वाढवावा लागेल. लोकांना आड, विहिरी, बारवात कचरा टाकण्यापासून परावृत्त करावी लागेल. लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन जलसंचय करावा लागेल. या अमृत महोत्सवी वर्षात बारवाचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न शासनाने हाती घेतला ही अभिनंदन बाब आहे. थोडक्यात पावसाचा प्रत्येक थेंबाचे संकलन करून एक वेगळी जलसंस्कृती निर्माण करण्याच्या प्रयत्नाला विनम्र अभिवादन व बारवाचे पुनर्जीवन करून बारवाचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी मंत्री महोदय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे जाहीर अभिनंदन. या निर्णयामुळे बारवाचे पुनर्जीवन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल.
लेखक - मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी
(समन्वयक सदस्य - महाराष्ट्र राज्य बारव संवर्धन समिती.)
==========================
Comments
Post a Comment