शिक्षण संस्थेअंतर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली पूर्ण करून डोनेशन घेणाऱ्या शाळेवर कारवाई करा - जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण
अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
=========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
अंबाजोगाई तालुक्यात शिक्षण संस्थेअंतर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली पूर्ण करून डोनेशन घेणाऱ्या शाळेवर तात्काळ कठोर कारवाई करा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी केली आहे. याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना सोमवार, दिनांक 22 मे रोजी निवेदन देण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने सोमवार रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंबाजोगाई तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळेतून प्रवेशासाठी बऱ्याच शाळेतून पैशांची मागणी केली जाते व पैसे आकारणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेतून प्रवेश दिला जात नाही. तसेच प्रवेशावेळी डोनेशन म्हणून घेतलेल्या त्या पैशांची अधिकृत पावती ही दिली जात नाही. यामुळे पालकांची मोठी कुचंबना होत आहे. शिवाय कामात दिरंगाई पण केली जाते. आपल्या आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये नोटीस बोर्डावर "येथे डोनेशन घेतले जात नाही" असे दर्शनी भागावर ठळकपणे नोटीस लिहिण्यात यावी अशी विनंती ही निवेदनातून केली आहे. वास्तविक प्राथमिक शिक्षण कायदा 2009 नुसार कोणत्याही शाळेला कुठली ही फीस आकारता येत नाही, तरी ही अनाधिकृत फी (डोनेशन) वसूल करण्याची पद्धत शासन नियमानूसार सर्व इंग्रजी आणि माध्यमांच्या शाळांमधून बंद करावी व अशा शाळांची सखोल चौकशी करण्यासाठी गटशिक्षण अधिकारी यांनी एक समिती निवडावी व विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा साहेबांनी या प्रकरणी लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात अशी सहकार्याची अपेक्षा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदरील निवेदनाच्या प्रतिलिपी गटशिक्षण अधिकारी साहेब, गटशिक्षण कार्यालय अंबाजोगाई आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रणजित डांगे, सचिन राऊत, अक्षय आपटे, अक्षय चव्हाण, पांडुरंग देशमुख, सुधीर उपाडे, दिगांबर सोळुंके, बाळासाहेब नेमाने श्रीकांत चव्हाण, विकास तट व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
================================
Comments
Post a Comment