"दारी अंगणी लाविलं रोप वाढलं का बाई ? त्याच्या बुडाचं कैचन कुणी काढलं का बाई ?"- सुप्रसिद्ध गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे

कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या राज्यस्तरीय कृषी कवी संमेलनातून मौलिक चिंतन - ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा

=========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने यावर्षी ही उंदरी येथे राज्यस्तरीय कृषी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे, या निमित्ताने मान्यवर कवी दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी त्यांच्या बहारदार काव्य रचनांमधून मौलिक चिंतन मांडतील असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी कृषी कवी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.


कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने दिवंगत विद्यार्थी प्रिय प्राचार्य कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त गुरूवार, दिनांक 18 मे रोजी सायंकाळी “काव्यसंध्या" हे निमंत्रित कविंचे कृषी कवी संमेलन उंदरी (ता.केज) येथे आयोजित करण्यात आले होते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव वाकुरे (सेवानिवृत्त जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, कोल्हापूर) तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नरेंद्र काळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दंत परिषद), मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया (अंबाजोगाई), भुजंगराव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. प्रतिष्ठाणच्या मागील आठ वर्षांच्या परंपरेनूसार या वर्षीही स्मृती समारोहाची सुरूवात कृषी कविसंमेलनानेच झाली. कवि संमेलनाचे समन्वयक कवी जनार्धन सोनवणे (केज), तर निमंत्रक कवयित्री सौ.अनुराधा सुर्यवंशी - ठोंबरे (लातूर) हे होते. तर कविसंमेलनाचे बहारदार सुत्रसंचालन कवी राजेश रेवले (सोनपेठ) व कवी गोरख शेंद्रे (अंबाजोगाई) यांनी केले. कृषी कवी संमेलनात सुप्रसिद्ध गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे (अंबाजोगाई), राजेंद्र रापतवार (अंबाजोगाई), रंगनाथ काकडे (बनसारोळा), पांडुरंग वागतकर (परभणी), राहूल गदळे (केज) तसेच उपस्थितांमधून कु.क्रांती गायकवाड, कु.अंकिता ठोंबरे हे कवी सहभागी झाले होते. या काव्य मैफिलीत "दारी अंगणी लाविलं रोप वाढलं का बाई ?, त्याच्या बुडाचं कैचन कुणी काढलं का बाई ?" अशी ग्रामीण कृषी संस्कृतीला साद घालणारी आशयसंपन्न रचना सादर करून गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे यांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. यावेळी कविवर्य राजेश रेवले यांनी ही आपल्या सुंदर काव्यवाचनातून आई - वडीलांबद्दल अपार श्रद्धा व्यक्त केली. आईचं वात होवून गृह गाभा-याला उजळून टाकणं आणि बापाच्या गृहमंदिराचा कळस होणं अशा सुंदर प्रतिमांनी आईचं मोठेपण अधोरेखीत केलं. "माय बोंडं फुलं पातं, माय कापसाची वात नवी आशा फुलवती, माय बापाच्या मनात ! माय घराचा उंबरा, माय अंगणी तुळस बापाच्या मंदिराची, माय असते कळस !" तर कविवर्य गोरख शेंद्रे यांनी आजच्या भरकटलेल्या तरूणाईला नवी दिशा देताना सुंदर कविता ऐकवली. शाळा महाविद्यालयात शिकताना जर आयुष्याला सुसंस्कारी वळण लागलं नाही. तर मुलं हातून सुटतात आणि कुटुंबाच्या जिवाला घोर लागून रहातो. अशा लेकरांसाठी ही कविता, "वाचत जा पुस्तक वाचत जा समाज, निळ्या भगव्या बरोबर पाडीत जा नमाज, रंगांच्या भेदामध्येच बरबाद झाल्या पिढ्या, उगाच कोणाच्या भानगडीत पडू नकोस वेड्या !" तसेच ज्येष्ठ कवि राजेंद्र रापतवार यांनी 'सुंदर नाते निसर्गाचे जपू कृषी धन' ही कविता ऐकवली. शेतक-यांनी आपली शेती बाजाराचा आंदाज घेऊन नियोजनपूर्वक केली तर अनेक पिढ्यांची दु:खापासून सुटका होवू शकेल. निसर्गाचा लहरीपणा, नशा आणि कर्जबाजारीपण सोडून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करून शेतीत आनंद निर्मिती करता येवू शकेल ही आशा वाटते. रापतवार आपल्या कवितेतून व्यक्त होताना म्हणतात की, "झुगारून देऊ निसर्गाची मनमानी, वृक्षारोपण संवर्धनाची घेऊन हमी. ते आता नशा दारूचे नकोच प्राशन नकोच ऋण - कर्ज योजनेचे प्रलोभन !", यावेळी प्रसिद्ध कविवर्य रंगनाथ काकडे यांनी शेतक-याच्या दु:खाला वामन कारणीभूत असल्याचा इतिहास पुनरूज्जीवित केला. खचलेल्या शेतक-यांचं बळ बांधणारी सुंदर रचना सादर केली, काकडे म्हणतात की, "शब्द विकणाऱ्यांची जातकुळी नाही. आमुची कष्टकऱ्यांची ही अवलाद आहे. मतलबी लवचिकता अंगी नाही आमुच्या स्वाभिमानाचा ताठ कणा पोलादी आहे. जरी रूप बदलून आजही आलास वामना डोक्यावर पाय ठेवण्याआधी होऊ दे आणखी एक सामना !" या संमेलनात केजचे कवी राहूल गदळे यांनी शालेय शिक्षणानंतर लग्न करून लेकी-बाळी सासरी निघून जातात आणि घरातलं, गावातलं चैतन्य हरवून जातं ही घालमेल गावच्या शाळेला, वडाच्या पारंब्यांना, नद्यांना जाणवल्या शिवाय रहात नाही. गदळे आपल्या कवितेतून व्यक्त होत, "नटून थटून लाजत मुरडत गावात फिरल्या पोरी, कुठं हरवल्या पोरी. भर दुपारी वडाखाली सुरपाट्या खेळतानी पारंब्यासोबत झुलल्या पोरी कुठं हरवल्या पोरी". या कवि संमेलनात स्थानिक बालकवयित्री कु.अंकिता ठोंबरे या दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने. आपल्या दैनंदिन आयुष्यातील जगणं  आवेशपूर्ण शैलीत सादर केलं. तिने शेतक-यांच्या दु:खाची रचना ऐकवली. या कवितेतून शेतीची दयनीय परिस्थिती असली तरी त्याच्या कष्टामुळं नक्की चांगले दिवस येतील हा सुंदर आशावाद ही तिने व्यक्त केला. "नियती खेळत आहे. शेतकऱ्यांबरोबर खेळ, थोडा संयम धरा, एक दिवस नक्कीच येईल शेतकऱ्यांची वेळ !" तर कवयित्री क्रांती गायकवाड यांच्या कवितेतून मुली पहायला येण्याचा प्रसंग मांडत असताना मुलींची होणारी घुसमट मोठ्या बारकाव्यांसह टिपली आहे. क्रांती म्हणतात "लग्नासाठी पाहुणे तिलाच पहायला येतात गो-या कातड्याची प्रसंशा करत तिला पसंत करून जातात. रंग काळा असेल तर परत चक्र फिरंतच रहातं, कांद्या पोह्याच्या तमाशात तिचं मन मात्र करपत जातं." याप्रसंगी कवयित्री सौ.अनुराधा सुर्यवंशी (ठोंबरे) यांनी कर्मयोगी प्राचार्य डॉ.बालासाहेब ठोंबरे या आपल्या स्वर्गवासी वडीलांना आपल्या कवितेतून विनम्र अभिवादन केलं. वडीलांच्या स्मृतींना उजाळा देत जड अंत:करणानं त्या म्हणाल्या की, "आज तुम्ही असता तर जगणं असतं वेगळं. आयुष्याची कोडी सोडविणं सोपं असतं सगळं ! आज तुम्ही असता तर कशाचीच नसती उणिव आपल्या माणसांच्या गर्दीत दुःखाची झालीच नसती जाणीव !" तसेच परभणीचे कवी पांडुरंग वागतकर यांनी आपल्या कृषी जीवन विषयक कविता ऐकविल्या. आशयसंपन्न कवितांचं सुस्पष्ट काव्यवानचन करताना ते म्हणाले, "गोठ्यावरच्या पाचटाला चघळून, पोटाची आग विझवते गाय, कणगीच्या तळाला घरासाठी भाकर शोधते माय. आठलेल्या विहिरीवर चिखलालाच हूंगते गाय, हांडाभर पाण्यासाठी रान धुंडाळते माय." तर केज येथील जेष्ठ कवी जनार्धन सोनवणे यांनी 'हिशोब' ही कविता ऐकवून शेती आणि शेतक-यांच्या पिढ्यान् पिढ्यांच्या दु:खाला वाचा फोडली. "दुष्काळ पडो अथवा सुकाळ होवो, ज्याचा त्याचा हिशोब पटलेला असतो. पाऊस पडो अथवा न पडो शेतकरी राजा मात्र लुटलेला असतो." या संमेलनात सुप्रसिद्ध गझलकार कविवर्य डाॅ.मुकुंद राजपंखे यांनी कुठला ही उपक्रम असो नाही, तर योजना सुरू करताना असलेला आनंद, उत्साह शेवटपर्यंत टिकायला हवा आणि त्याची फल:निष्पत्ती व्हायला हवी अशी रास्त भूमिका मांडली. वृक्षारोपण केल्यानंतर त्या झाडांची सर्वोतोपरी निगरानी करण्याची जबाबदारी ही आपलीच समजून पार पाडायला हवी. तुकोबा म्हणतात तसा झाडांसारखा आनंददायी 'सोयरा' नाही याची जाणीव करून दिली. "दारी अंगणी लाविलं रोप वाढलं का बाई ?त्याच्या बुडाचं कैचन कुणी काढलं का बाई ? जया ओसरी ना वटा नाही, अंगणात झाड अशा घरादारामंदी सुख नांदल का बाई ?, पान फुलं फळं आणि जन्मभर शुद्ध हवा, झाड सोयरा म्हणाला 'तुका' वाचलं का बाई ? या कृषी कविसंमेलनाचा समारोप ज्ञानदेव वाकुरे यांनी प्रख्यात कवी स.ग.पायपोळ यांची कविता 'हंबरूनी वासराला चाटते जवा गाय' ऐकवून उपस्थितांना आई आणि लेकरांच्या वात्सल्याचा परीचय करून दिला. हे कृषि कवी संमेलन रसिक श्रोत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील असे वाटते. कवि संमेलनासाठी उत्स्फूर्तपणे डॉ.बाबासाहेब ठोंबरे आणि त्यांचं गोणगोत उपस्थित होते. आणि उंदरीचे ग्रामस्थ उपस्थित होते. महिला आणि तरूणांसह बुजुर्गांनी ही या ऐतिहासिक तसेच अविस्मरणीय शेती मातीच्या आणि एकूणच संस्कृती संवर्धनाला समर्पित कवि संमेलनाचा मनमुराद आस्वाद घेतला. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन प्रमोद ठोंबरे यांनी केले तर प्रास्ताविक भारत कुरवडे यांनी करून उपस्थितांचे आभार पवन ठोंबरे यांनी मानले. कृषी कवी संमेलनासाठी केज, अंबाजोगाई, धारूर तालुका व बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह स्त्री - पुरूष नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे (पाटील) आणि जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनंतराव ठोंबरे, प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, सुदामराव ठोंबरे, बाळासाहेब सुर्यवंशी, उत्तरेश्वर सोनवणे, भरतराव ठोंबरे, लालासाहेब ठोंबरे, रामराव ठोंबरे, प्रा.बाळासाहेब सुर्यवंशी, सौ.अनुराधा ठोंबरे - सुर्यवंशी यांचेसह उंदरी (ता.केज) येथील समस्त गावकरी, माजी कृषी विद्यार्थी संघ, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथील मित्र परिवार, नातेवाईक आणि ठोंबरे कुटुंबियांनी पुढाकार घेतला होता.



==========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)