५० वर्षांपूर्वी दलित युवक आघाडीने हाताळलेले प्रश्न आजही कायम आहेत - पार्थ पोळके

सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई खिवंसरा आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित

प्रा.माधव मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंबाजोगाईत व्याख्यान व आदर्श कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण

=========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

सुमारे ५० वर्षांपूर्वी दलित युवक आघाडीने हाताळलेले प्रश्न आजही कायम आहेत अशी खंत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके (करमाळा) यांनी व्यक्त केली. ते अंबाजोगाई येथील प्रा.माधव मोरे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई खिवंसरा यांना यावर्षीचा "आदर्श कार्यकर्ता" पुरस्कार प्रदान करण्यात आला.


येथील प्रा.माधव मोरे यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या नांवे असलेल्या स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने गुरूवार, दिनांक १८ मे रोजी व्याख्यान व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन योगेश्वरी नूतन विद्यालय (प्राथमिक विभाग), प्रशांतनगर, अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ (दैनिक विवेकसिंधु) तर विचारमंचावर प्रमुख व्याख्याते म्हणून पार्थ पोळके, करमाळा (अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य.), प्रा.माधव मोरे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.एस.के.जोगदंड हे उपस्थित होते. तर यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई खिवंसरा (छत्रपती संभाजीनगर) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रा.माधव मोरे स्मृती प्रतिष्ठानचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांकडून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्मृतिशेष प्रा.माधव मोरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके (करमाळा) यांनी सांगितले की, दलित युवक आघाडीने केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे आपण अंबाजोगाईला ओळखतो. प्रा.माधव मोरे सर हे समुहाचे नेते होते. आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र आलो तेच मराठवाडा विद्यापीठ नामांतरामुळे, या प्रश्नावर मराठवाडा पेटला तेव्हा आम्ही सर्व कार्यकर्ते मनातून खूप अस्वस्थ झालो होतोत, मराठवाडा पेटला होता तो विझविण्याचे महत्वपूर्ण काम दलित युवक आघाडीने केले. गायरान जमीनीचा प्रश्न, विद्यार्थ्यांची स्काॅलरशीप हे प्रश्न व्यवस्थित हाताळून दलित युवक आघाडीने मोठी आंदोलने केली. पण, सुमारे ५० वर्षांपूर्वी दलित युवक आघाडीने हाताळलेले प्रश्न आजही कायम आहेत अशी खंत व्यक्त करून विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके (करमाळा) यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण सोडू शकत नाही. कारण, बाबासाहेबांच्या विचारांची आज मोठी गरज आहे. राजकारण, समाजाचे नेते, मनुवाद याबाबत इतिहासाचे दाखले देत वैचारिक मांडणी करून पार्थ पोळके यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई खिवंसरा म्हणाल्या की, दलित युवक आघाडीचे माध्यमातून प्रा.माधव मोरे सरांनी तत्कालीन वंचित समाजासाठी मोठे काम केले. प्रसंगी त्यांना आनेकदा संघर्ष करावा लागला. त्याकाळी राजकीय मंडळींकडून ही त्यांना खूप त्रास झाला. पण, प्रा.मोरे सरांनी न डगमगता चळवळ अधिक बळकट केली. लढा उभारला. सामाजिक कार्य करतांनाच एका अपघातात सर आपल्यातून अकाली गेले. असे सांगून खिवंसरा यांनी त्यांच्या भाषणात प्रा.माधव मोरे या वादळी व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण आलेख मांडला. अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ म्हणाले की, हे प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकीतून कार्य करीत आहे. त्यामुळे प्रा.माधव मोरे स्मृती प्रतिष्ठानच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. आजची राजकीय विचारधारा ही बहुजन समाजावर अन्याय करणारी आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांकडून सातत्याने दलित विरोधी धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय तसेच विद्यापीठांचे अभ्यासक्रम बदलत आहेत. सत्ताधारी हे प्रतिगामी व्यवस्थेला हवा तसाच अभ्यासक्रम नव्या पिढीच्या हाती देवून पुन्हा मनुस्मृतीचे कायदे आणू पाहत आहेत. याकडे ज्येष्ठ संपादक प्रा.गाठाळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन स्मृती प्रतिष्ठानचे सचिव लंकेश वेडे यांनी करून उपस्थितांचे आभार सहसचिव सुखदेव भुंबे यांनी मानले. या कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, डॉ.साहेबराव गाठाळ, ऍड.अनंतराव जगतकर, सुधाताई जोगदंड, प्रा.माधव मोरे स्मृती प्रतिष्ठानचे सचिव लंकेश वेडे, सहसचिव सुखदेव भुंबे, भगवानराव ढगे, समीर मोरे, प्रा.अरविंद खांडके, प्रा.पी.वाय.फुलवरे, ज्ञानोबा रोकडे, चंद्रकांत वडमारे, प्रा.एम.बी चव्हाण, प्रा.संभाजी बनसोडे, व्यंकट वेडे, शशिकांत सोनकांबळे, रामेश्वर खाडे, चंद्रमणी गोवंदे, ए.एन.कांबळे, दिलीप वाघचौरे‌ यांच्यासह अंबाजोगाई शहरातील सामाजिक, राजकीय, शिक्षण, वैद्यकीय, सांस्कृतिक, विधी, व्यापार, पत्रकारिता, स्मृती प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)