आधुनिक भारताच्या उभारणीसाठी योगदान द्यावे - सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
क्रांतीसूर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'एक पेन एक वही अभियान' व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
==============================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
महामानव संविधानकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व इंडीयन मेडीकल असोसिएशन सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य तपासणी व उपचार शिबीर आणि शालेय विद्यार्थ्यांकरिता 'एक वही, एक पेन' अभियान राबवून महामानवांना अभिवादन करण्यात आले.
अंबाजोगाई शहरातील समाधान मानसोपचार रूग्णालयात आयोजित कार्यक्रमात उदघाटक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अशोक दळवे, सामाजिक कार्यकर्ते अनील पिंपळे, वैद्यकीय तज्ज्ञ मार्गदर्शक बालरोग तज्ज्ञ डॉ.बळीराम मुंडे, मधुमेह तज्ज्ञ डॉ.नागोराव डेरनासे यांची प्रमुख उपस्थिती होती. उदघाटकीय भाषणात बोलताना जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करीत समाजापुढे डॉ.राजेश इंगोले यांनी आपल्या कार्याने आदर्श निर्माण केला आहे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी समाजात असे उपक्रम राबविले पाहिजेत. अशा उपक्रमांनी समाजाला दिशा मिळते, चालना मिळते आणि समाज समृद्ध होतो असे प्रतिपादन केले. सामाजिक कार्यकर्ते अनिल पिंपळे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या स्वप्नातील भारत देश घडविण्यासाठी प्रत्येकाणे आपला वाटा उचलला पाहिजे. समाजात बदलह घडविण्यासाठी आधी आपल्यात सकारात्मक बदल घडविला पाहिजे असे मत मांडले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.राजेश इंगोले यांनी गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो. आरोग्य शिबिरात अनेक नामांकीत डॉक्टर्स गरीब गरजू रूग्णांची मोफत तपासणी करतात, त्यांचे निदान करतात, त्यांचे मोफत उपचार करतात. ज्या रूग्णांना पैशाअभावी तज्ज्ञ डॉक्टर्सला दाखविता येत नाही त्यांना मदत व्हावी, तसेच अनेक शालेय विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते अशी पार्श्वभूमी सांगितली. महापुरूषांच्या स्वप्नातील समाज निरोगी, शिक्षित असलेला, विज्ञानवादी, व्यसनमुक्त, अंधश्रद्धा मुक्त, तर्कबुद्धी असणारा, व्यवस्थेला प्रश्न विचारणारा, अन्याया विरूद्ध लढणारा, समता, न्याय, बंधुता प्रस्थापीत करण्यासाठी संघर्षाची तयारी असणारा, शासनकर्ता बनण्याची जिद्द बाळगणारा स्वयंभू समाज होता. हा समाज घडविण्यासाठी, निर्माण करण्यासाठी अल्पसा प्रयत्न म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती दिली. असा गुणवान, चारित्र्यवान समाजच आधुनिक भारताचे निर्माण करू शकेल आणि भारताला महासत्ता बनवू शकेल असे मत डॉ.इंगोले यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता थोरात तर आभार प्रदर्शन आदिती मस्के हिने केले. शिबीराच्या यशस्वितेसाठी वाजेद शेख, सचिन साळवे, अक्षय इंगोले, मनोज इंगोले, धम्मराज सिताप, गौतम घनघाव, विशाल अंबाड, मंगेश गोरे, दीप्ती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी निकिता गाडेकर नेहा खानापूरकर, कोमल गायकवाड, पल्लवी मनोरे, वैष्णवी टेकाळे, पूजा आडे, सचिन डोंगरे, श्रीनिवास चव्हाण यांनी पुढाकार घेतला.
===============================================
Comments
Post a Comment