अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्याकडून महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन


अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात मुस्लिम महिलांचा इफ्तार कार्यक्रम

============================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

सामाजिक सलोखा राखला जावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजातील महिलांसाठी रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली होती. यावेळी हिंदू आणि मुस्लिम महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आजकाल इफ्तार पार्टीला सर्वत्र पुरूषांचीच उपस्थिती आपण बघितलेली आहे. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या पुढाकाराने अंबाजोगाई शहरात प्रथमच पोलिस प्रशासनाकडून महिलांसाठीच्या इफ्तार पार्टीचे अतिशय उत्तम नियोजन व आयोजन अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवार दिनांक १९ एप्रिल रोजी करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमास विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुस्लिम महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला. सोबतच हिंदू धर्मीय महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अंबाजोगाई शहरात हिंदू आणि मुस्लिम धर्मियांत एकोप्याचे वातावरण निर्माण व्हावे, शहरातील जातीय सलोख्याने वृध्दी व्हावी म्हणून रमजान महिन्यातील रोजा इफ्तार कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रमझान महिन्यात साधारणतः पुरूषांचेच रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या रोजा इफ्तार पार्टीस मुस्लिम महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. या इफ्तार कार्यक्रमास शहरातील बहुसंख्य मुस्लिम महिलांसह अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे, प्राचार्य डॉ.अखिला गौस, काजी मेराज, फरहा मुजीब काजी, प्रा.महजबीन फारूकी, रजिया पप्पूवाले, ऍड.निलोफर शेख, प्रा.डॉ.शैलजा बरूरे, प्रा.डॉ.अरूंधती पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार, पीएसआय शिंगाडे यांच्यासह अंबाजोगाई शहर, ग्रामीण पोलिस स्टेशन मधील महिला पोलीस कर्मचारी - अधिकारी उपस्थित होत्या. आपले कर्तव्य सांभाळत असतांनाच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून मुस्लिम भगिणींसाठी आयोजित केलेल्या रोजा इफ्तार कार्यक्रम या उपक्रमाचे सर्वस्तरांतून कौतुक केले जात आहे.

समाजाला बंधूभाव आणि आपुलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न :

अंबाजोगाई शहरातील मुस्लिम महिलांसह सर्वधर्मीय महिला भगिनींसाठी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने रोजा इफ्तारीचा कार्यक्रम आयोजित केला. रमजानचा पवित्र महिना सुरू असून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अजिबात अन्नपाणी न घेता कडक उपवास करणार्‍या या महिलांसाठी इफ्तारचे आयोजन करण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. या माध्यमातून हा अनोखा उपक्रम घेऊन समाजात बंधूभावाचा आणि आपुलकीचा संदेश पोलिसांनी या उपक्रमातून दिला आहे याचा विशेष आनंद आहे. मुस्लिम व हिंदू धर्मीय महिला भगिनींनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेऊन भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सहभागी सर्व महिला भगिनींचे पोलिस प्रशासनाकडून मनःपूर्वक आभार..!

- कविता नेरकर-पवार (अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई.)

================================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)