खोलेश्वर महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन
आयुष्यात ध्येय समोर असणे गरजेचे - अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर-पवार
=============================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
तुमची जडण - घडण उत्तम होण्यासाठी तसेच तुम्ही एक जबाबदार व सुजाण नागरिक व्हावे यासाठी खोलेश्वर महाविद्यालयाने तुमच्यावर जे चांगले संस्कार केले आहेत. त्या संस्कारांची शिदोरी सोबत ठेवून तुम्ही भविष्यात वाटचाल करावी, कोणतेही काम करा मात्र आयुष्यात एक चांगला माणूस बनायला शिका असे आवाहन अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर-पवार यांनी केले. त्या खोलेश्वर महाविद्यालयात आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात शनिवार, दि. 29 एप्रिल रोजी खोलेश्वर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर हे होते. तर यावेळी व्यासपीठावर भाशिप्र संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, केंद्रिय कार्यकारीणी सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, केंद्रीय कार्यकारीणी सदस्या डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर, सौ.वर्षाताई मुंडे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष विजयराव वालवडकर, प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी, उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष पटेकर, प्रा.डॉ.बिभिषण फड, डॉ.दिपक फुलारी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, देवी सरस्वती व महर्षी योगी अरविंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर प्रा.शैलेश पुराणिक व प्रा.महादेव माने यांनी ईशस्तवन करून विद्यापीठ गीत सादर केले. उपस्थित पदवीधारक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर-पवार म्हणाल्या की, आत्तापर्यंत तुम्ही एका विशिष्ट कोषात होता, आता मात्र तुमची आयुष्यातील खरी लढाई सुरू झाली आहे. महाविद्यालयाने व संस्थेने तुमच्यावर जे संस्कार केले आहेत. त्या संस्काररूपी शिदोरीच्या बळावर तुम्हाला तुमच्या आयुष्याची वाटचाल यशस्वी करावयाची आहे. मात्र त्यासाठी आधी तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले पाहिजे व त्यानुसारच पुढील वाटचाल केली पाहिजे, जोपर्यंत तुम्ही प्राप्त केलेल्या पदवीचा वापर तुमचे आयुष्य सुखकर होण्यासाठी, स्वतःचा तसेच पर्यायाने समाजाचा विकास करण्यासाठी करीत नाहीत तोपर्यंत त्या पदवीचा काही उपयोग नाही. म्हणून तुम्ही केवळ इथेच न थांबता आयुष्यात पुढे ही शिकत राहिले पाहिजे. कारण, माणूस जेवढा शिकत राहतो तेवढा तो प्रगल्भ व समृद्ध बनत जातो. तुम्ही खुप कष्ट करा, यश संपादन करा, मात्र आपल्या आई - वडीलांना व गुरूजनांना विसरू नका असा मौलिक सल्ला ही त्यांनी या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पदवी प्राप्त करणे हा कोणत्याही विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा तुम्ही आज पुर्ण केलेला आहे. मात्र भावी आयुष्यात येणार्या संकटांना ही समर्थपणे तोंड देण्याची क्षमता आपल्या अंगी असली पाहिजे. त्यासाठी या संस्कार केंद्राने तुमच्यावर उत्तमोत्तम संस्कार केलेले आहेत. याची जाण बाळगुण शेवटी येथून बाहेर पडताना समाजात आपण एक जबाबदार व सुजाण नागरिक म्हणून बाहेर पडावे व देशाला प्रगतीकडे नेण्याचे काम करावे अशी अपेक्षा कार्यवाह डॉ.वैद्य यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.सुरेंद्रजी आलुरकर म्हणाले की, तुम्ही आयुष्यातील एका पातळीवर जाण्यासाठी आता पात्र झालेले आहात, सध्याचा काळ हा अत्यंत वेगाने बदलणारा काळ आहे. त्याला तुम्ही योग्य त्या पद्धतीने सामोरे गेले पाहिजे. ईश्वर सर्वांनाच पंख देतो. मात्र या पंखांमध्ये बळ देण्याचे काम या महाविद्यालयाने व संस्थेने केलेले आहे. याची मला खात्री आहे. आपणांस मिळालेल्या ईश्वरदत्त कौशल्याची निगा राखून पुढील वाटचाल केली पाहिजे. आपणांस मिळालेल्या ज्ञान, कौशल्य व आत्मविश्वासाच्या बळावरच आपण पुढे जावू शकतो. असा संदेशही त्यांनी या प्रसंगी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी म्हणाले की, आपण घेतलेल्या ज्ञान व कौशल्याचा उचित सन्मान झाला पाहिजे, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भविष्यात आपण या देशाचे सुजाण नागरिक व देशाचा आधारस्तंभ व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्रिय कार्यकारीणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी यांनीही विद्यापीठाच्या वतीने घेतल्या जाणार्या या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे कौतुक करून उपस्थित पदवीधारक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थीनींना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी एकूण 168 पदवीधारक विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जिजाराम कावळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष पटेकर यांनी मानले.
================================================
Comments
Post a Comment