भगवान तथागत गौतम बुद्ध यांनी मांडला जाती निर्मुलनाचा विचार - प्रा.डाॅ.सुधीर अनवले यांचे प्रतिपादन


अंबाजोगाईत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची प्रबोधनपर व्याख्यानमाला

=======================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नुकतेच दोन दिवसीय प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

अंबाजोगाईत मागील 31 वर्षांपासून कार्यरत असलेली सर्वांत जुनी व सन 2002 साली शासनाकडे अधिकृतरित्या नोंदणीकृत झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंतीनिमित्त दरवर्षी महाराष्ट्रातील नामांकीत व्याख्यात्यांना निमंत्रित करून प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त 22 आणि 23 एप्रिल 2023 या कालावधीत आयोजित दोन दिवसीय प्रबोधनपर व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते सहभागी झाले. शनिवार, दिनांक 22 एप्रिल रोजी आयोजित व्याख्यानमाला पुष्प पहिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सिध्देश्वर बिराजदार (औषधशास्त्र विभागप्रमुख, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई.) हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डाॅ.सुधीर अनवले (प्रदेश नेते, भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना) हे लाभले होते. प्रा.डाॅ.सुधीर अनवले यांनी "जाती अंताचा लढा आणि फुले - आंबेडकरवाद" या विषयावर आपले मौलिक विचार मांडताना सांगितले की, जाती निर्मुलनाचा विचार भगवान तथागत गौतम बुद्ध यांनी मांडला. कारण, त्यांना माहीत होते की, जाती निर्मुलन झाल्याशिवाय मानवाच्या समस्या सुटणार नाहीत. पुढे त्यांनी सांगितले की, धर्मशास्त्र बंधनातून प्रत्येक माणूस मुक्त झाला पाहिजे, जाती निर्मुलन ही काळाची गरज आहे. बौद्ध अनुयायांनी 22 प्रतिज्ञांचे पालन करावे, धर्माच्या नावावर बहुजनांचा मोठा छळ झाला, त्यांना राजकीय व सामाजिक संधी उपलब्ध झाल्या नाहीत, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर ही अजून ही वंचितांचा संघर्ष सुरूच आहे. त्यामुळे बहुजन समाज आणि भटक्या विमुक्तांनी संघटीत झाले पाहिजे, नवे नेतृत्व निर्माण झाले पाहिजे असे प्रतिपादन प्रा.डाॅ.अनवले यांनी केले. तर रविवार, दिनांक 23 एप्रिल रोजी आयोजित व्याख्यानमाला पुष्प दुसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.भास्कर खैरे (अधिष्ठाता, स्वा.रा.ती.वै.महा.व रूग्णालय, अंबाजोगाई) हे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.उमेश बगाडे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) यांनी "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्य विषयक विचार" या विषयावर आपले मौलिक विचार मांडताना सांगितले की, पारतंत्र्य हे अमानवीय आहे. त्यामुळेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्ती व विचार स्वातंत्र्याचा नेहमीच पुरस्कार केला. "अनहिलेशन ऑफ कास्ट" मधून जगाला मौलिक असा संदेश दिला. भारतातील गुलामीची प्रथेकडे जगाचे लक्ष वेधले, शोषण, दमन यांचा सातत्याने विरोध केला. दुबळे, वंचित घटकांसाठी वेळोवेळी आवाज उठविला. सत्य, सत्ता, निर्भयता, स्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठ विचार, लोकशिक्षण, चारित्र्य, धार्मिक बंधने, स्त्री - पुरूष समानता, भांडवलशाही याबाबत वेळोवेळी समायोचित भाष्य केले, भारतीय जनतेला अप्रगत ठेवणाऱ्या सर्व बंधनांना झुगारण्याचे महान कार्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे प्रतिपादन प्रा.डॉ.उमेश बगाडे यांनी केले. दोन दिवसीय प्रबोधनपर व्याख्यानमालेचे सुत्रसंचालन समितीचे सचिव भगवानराव ढगे यांनी केले. तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष लंकेश वेडे यांनी करून उपस्थितांचे आभार समिती सदस्य सुखदेव भुंबे यांनी मानले. अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांनी दोन दिवसीय प्रबोधनपर व्याख्यानमालेस उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर व्याख्यानमालेच्या यशस्वितेसाठी समितीचे डॉ.श्रीहरी नागरगोजे (अध्यक्ष), ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.एस.के.जोगदंड (उपाध्यक्ष), लंकेश वेडे (कार्याध्यक्ष), भगवानराव ढगे (सचिव), प्रा.गौतम गायकवाड (सहसचिव) तसेच एॅड.मीर महाजेर अली उस्मानी, ज्येष्ठ विधीज्ञ एॅड.बाबुराव तिडके, काॅ.बब्रुवाहन पोटभरे, शिवाजी खोगरे, संभाजी सातपुते, व्यंकट वेडे, सुखदेव भुंबे, एकनाथ टोनपे, प्रा.डॉ.मुकूंद राजपंखे, विजयाताई कांबळे, ज्ञानोबा रोकडे यांच्यासह सर्व सन्माननिय कार्यकारीणी सदस्य यांनी पुढाकार घेतला होता.

=======================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)