माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे 'राष्ट्रीय भिमरत्न' पुरस्काराने सन्मानित
सर्वस्तरांतून माजी प्राचार्य डॉ.कांबळे यांच्या निवडीचे स्वागत व अभिनंदन
============================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी महू, मध्यप्रदेश सरकार यांच्या वतीने दिला जाणारा व राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा "राष्ट्रीय भिमरत्न पुरस्कार - 2023" अंबाजोगाई येथील ज्येष्ठ साहित्यिक, प्रवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक व आंबेडकरी विचाराचे भाष्यकार माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांना महामानव डॉ.बाबासाहेब यांच्या जन्मभूमीत डॉ.आंबेडकर नगर, महू, मध्यप्रदेश येथे एका अतिभव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी प्रदान करण्यात आला.
मध्यप्रदेशचे महामहीम राज्यपाल मंगूभाई सी.पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मा.शिवराजसिंह चौहान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी महू (मध्यप्रदेश) चे अध्यक्ष भदन्त प्रा.सुमेधबोधी महाथेरो (राज्यमंत्री दर्जा प्राप्त), सचिव राजेश वानखेडे या अतिविशेष मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. माजी प्राचार्य डॉ.कांबळे हे मागील 36 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी विविध शैक्षणिक प्रयोग साकारत असंख्य विद्यार्थी घडवले आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदस्थ म्हणून कार्यरत आहेत. महामानव फुले - शाहू - आंबेडकर यांच्या प्रवर्तनवादी विचारांचे ते प्रभावी भाष्यकार आहेत, बौद्ध साहित्य संमेलनाचे ते प्रवर्तक असून आजपावेतो त्यांनी महाराष्ट्रात 7 बौद्ध साहित्य संमेलने आयोजित केली आहेत. त्यांच्या 'तुगाव' या जन्मगावी दरवर्षी ते अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेतात. पहिल्या शिवार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. तसेच अंबाजोगाई येथील नवव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या तीन महाविद्यालयातून प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून मागील 36 वर्षे शिक्षण सेवा करून गतवर्षी निवृत्त झालेले अंबाजोगाईकरांचे लाडके व बहुआयामी व्यक्तिमत्व तथा कला, साहित्य, संस्कृती, समाज आणि शिक्षण या क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले, विद्यापीठ नामांतर चळवळ, मराठवाडा विकास आंदोलन, अंबाजोगाई जिल्हा निर्मिती, मराठी भाषेचे विद्यापीठ निर्मिती, यासाठी सक्रीय असलेले माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांचा 2022 साली भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, या समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंञी,भारत सरकार तथा रिपाइंचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांचा विशेष सेवागौरव करण्यात आला. या समारंभाला संपूर्ण मराठवाड्यातील मान्यवरांसह अंबाजोगाईकर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते हे विशेष होय. माजी प्राचार्य डॉ.कांबळे यांचा मितभाषी स्वभाव, अजातशत्रू व्यक्तीमत्व यामुळे त्यांची सर्वांशी मैत्री आहे. कला, साहित्य, संस्कृती, सामाजिक व धार्मिक चळवळीतील माजी प्राचार्य डॉ.कांबळे यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.अशोक कुकडे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.किशोर गिरवलकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार आणि नातेवाईक यांनी माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
=============================================
Comments
Post a Comment