महामहीम राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रा.डी.जी.धाकडे 'राष्ट्रीय भिमरत्न' पुरस्काराने सन्मानित




प्रा.डी.जी.धाकडे यांचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन

===============================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी महू, मध्यप्रदेश सरकार यांच्या वतीने दिला जाणारा व राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा "राष्ट्रीय भिमरत्न पुरस्कार - 2023" अंबाजोगाई येथील ज्येष्ठ ग्रंथपाल, आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते प्रा.डी.जी.धाकडे यांना महामानव डॉ.बाबासाहेब यांच्या जन्मभूमीत डॉ.आंबेडकर नगर, महू, मध्यप्रदेश येथे एका अतिभव्य सोहळ्यात महामहीम राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी प्रदान करण्यात आला.

मध्यप्रदेशचे महामहीम राज्यपाल मा.मंगूभाई सी.पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मा.शिवराजसिंह चौहान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी महू (मध्यप्रदेश) चे अध्यक्ष पूज्य भदन्त प्रा.सुमेधबोधी महाथेरो (राज्यमंत्री दर्जा प्राप्त), सचिव राजेश वानखेडे या अतिविशेष मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार निवृत्त ग्रंथपाल प्रा.डी.जी.धाकडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. निवृत्त ग्रंथपाल प्रा.डी.जी.धाकडे हे श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी महाविद्यालयात सन 1968 साली ग्रंथपाल म्हणून रूजू झाले. त्यांनी 38 वर्षे ग्रंथपाल म्हणून सेवा केली. अंबाजोगाई शहर, तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्हा आणि मराठवाड्यात सर्वदूर वाचन संस्कृती पोहोचवली. ग्रंथालय चळवळ बळकट करण्यासाठी "गाव तिथे ग्रंथालय" हे ब्रीद घेऊन गावोगावी ग्रंथप्रेमी युवक, नागरिकांना ग्रंथालय स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले व प्रोत्साहन ही दिले. स्वतः ही त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना केली. 15 वर्षे बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्षपद भूषविले. तसेच विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले. याच काळात त्यांनी ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला. त्यामुळे अनेक होतकरू युवकांना ग्रंथपाल म्हणून विविध ठिकाणी नौकरी मिळाली. तसेच ग्रंथालय चळवळीचे केंद्र अंबाजोगाईत कायम ठेवले. याबरोबरच प्रा.दादाराव गोपाळराव धाकडे हे सन 1968 ला अंबाजोगाईला आल्यानंतर येथील सर्व परिस्थितीचा विचार केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या भागात बुध्द धम्माची ओळख करून देणे व धम्म कार्य पुढे नेणे ही काळाची गरज आहे हे ओळखून प्रा.धाकडे यांनी त्यांचे त्या काळातील समवयस्क नौकरदार मित्र यांना सोबत घेऊन धम्म कार्याला सुरूवात केली. अंबाजोगाई शहरातील वस्त्यांचे नामकरण मिलिंदनगर, भीमनगर, बोधिघाट करण्यात आले. सन 1972 - 73 च्या काळात पूज्य भदन्त उपाली आणि त्यांचे शिष्य यांच्यासोबत ग्रामीण भागात जाऊन बुद्ध धम्माची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. प्रबोधनपर आणि वैचारिक व्याख्यानांचे आयोजन केले. स्वतः विनामूल्य बौद्ध विवाह किंवा इतर बौद्ध पध्दतीने विधी पार पाडले. त्याचबरोबर आपले राहणीमान, शिक्षण आणि धम्म याबद्दल समाजामध्ये प्रबोधन करणे, मुळावा येथील पूज्य भदन्त धम्मसेवक, पूज्य भन्ते सुमेध बोधी व पूज्य भन्ते खेमधम्म यांना आमंत्रित करून धम्माचा प्रचार सुरू केला. अंबाजोगाई शहरात येणाऱ्या पूज्य बौद्ध भिक्खूंची व्यवस्था करणे, आणि त्यांच्या धम्म कार्याला सहकार्य करणे, या धार्मिक कार्याचा एक भाग म्हणून स्नेहनगर येथील बुद्ध विहाराची उभारणी करण्यात आली, धम्म परिषदांचे आयोजन करणे आदींसाठी प्रा.धाकडे यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला. 

प्रा.डी.जी.धाकडे यांना यापूर्वी धम्मभूषण, धम्म रक्षक, समाजभूषण व नुकताच "राष्ट्रीय भिमरत्न" हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यासोबतच सामाजिक बांधिलकीतून प्रौढ शिक्षण वर्ग चालवणे, गरजू शालेय विद्यार्थ्यांना दूध आणि आहार वाटप करणे, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देणे, प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक शुल्का संबंधीच्या अडचणी सोडविणे, दहा वर्षे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तसेच पाणी परिषद, भूमीहीनांचा सत्याग्रह, स्कॉलरशिप आंदोलन यात त्यांनी सहभाग घेतला आहे. सामाजिक सलोखा कायम राहावा या दृष्टीने सतत सतर्क राहून ग्रामीण भागातील अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी दक्षता पथक तयार करून त्यात त्यांनी काम केले आहे. प्रा.धाकडे हे श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या पतसंस्थेचे दहा वर्षे सचिव राहिले आहेत, स्नेहनगर गृहनिर्माण संस्थेची उभारणी केली, या संस्थेचे त्यांनी 25 वर्षे सचिवपद भूषविले आहे. वंचित व गरजू समाज घटकांना योग्य दरात अन्नधान्य मिळावे या उद्देशाने त्यांनी समता ग्राहक भांडारची स्थापना केली. त्या माध्यमातून आजही स्वस्त धान्य दुकान सुरू आहे. यासोबत बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व समता ग्राहक भांडार, अंबाजोगाई या संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. महामानव फुले - शाहू - आंबेडकर यांच्या प्रवर्तनवादी विचारांचे ते पाईक आहेत, प्रा.डी.जी.धाकडे यांचा नम्र स्वभाव आणि अजातशत्रू व्यक्तीमत्व यामुळे त्यांचे सर्वांशीच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ग्रंथालय, सामाजिक व धम्म चळवळीतील प्रा.धाकडे यांचे महत्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार आणि नातेवाईक यांनी प्रा.डी.जी.धाकडे यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आहे.


===============================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)