समाजसेवक कै.राजाभाऊ चौसाळकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विश्व हिंदु परिषदेने गोशाळेस दिली औषधे


समाज उन्नतीच्या विचारासाठी नि:स्वार्थ आयुष्य जगणे काळाची गरज - जिल्हा संघ कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर

==============================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

समाजसेवक कै.राजाभाऊ चौसाळकर यांचे आयुष्य हे भौतिक सुख संपन्नतेचं असताना ही विचार परिवाराच्या वाटेवर प्रवास करताना त्यांनी कठीण प्रसंगात केलेला संघर्ष आणि समाज उन्नतीच्या विचारासाठी नि:स्वार्थ सेवा, समर्पित आयुष्य घालवून त्यांनी केलेले समाजकार्य हे खर्‍या अर्थाने अविस्मरणीय असल्याचे गौरवोद्गार बीड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर यांनी काढले. 

अंबाजोगाई शहरात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच समाजसेवक कै.राजाभाऊ चौसाळकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गोशाळेला दिलेल्या औषधगोळ्या वितरण कार्यक्रमात क्षीरसागर हे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. खोलेश्वर माध्यमिक शाळेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमासाठी व्यासपीठावर बीड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर, समाजसेवक कमलाकरराव चौसाळकर, भाशिप्र संस्था स्थानिक अध्यक्ष विजयराव वालवडकर या मान्यवरांसह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त अभियंता भागवतराव कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर डॉ.गोपाळ चौसाळकर यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजना मागची भुमिका विशद केली. या प्रसंगी बोलताना बिपीनदादा क्षीरसागर म्हणाले की, समाजात काम करताना सामाजिक दायित्व आणि संवेदना ठेवून अंत्योदय उन्नतीसाठी काम करणार्‍या परिवारांपैकी चौसाळकर हा एक परिवार असून समाजसेवक स्व.राजाभाऊ दादांच्या विचारांचा वारसा नविन पिढी चालवते हे कमी नसे. आर्थिक सुबत्ता असून ही केवळ विचाराचा झेंडा खांद्यावर घेवून काम करताना त्यांना तत्कालीन काळात समाजातून झालेला विरोध आणि त्या विरोधात केलेला संघर्ष या कठीण यातना भोगून जे आज वैभव आणि भौतिक सुख पहायला मिळते. त्यामागे दादांची प्रेरणा असल्याचे क्षीरसागर म्हणाले. संघ कार्याला शंभर वर्षे पुर्ण होताना विश्व हिंदु परिषद एक आयाम आणि करीत असलेले कार्य श्रेष्ठ असून धर्मरक्षणाच्या धारणा लक्षात घेवून भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी आपण सारे विचारधारेच्या प्रवाहातून काम करीत आहोत, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील समाज उन्नतीचा घालून दिलेला आदर्श हाच खर्‍या अर्थाने लोक कल्याणकारी मार्ग असल्याचे क्षीरसागर म्हणाले. जिल्हा कार्यवाह बिपिनदादा क्षीरसागर पुढे म्हणाले की, राजाभाऊ दादांनी अतिशय प्रतिकूल आणि खडतर परिस्थिती संघ कार्याचा झेंडा आपल्या खांद्यावर स्वातंत्र्यपूर्व काळापासून घेतला व खोलेश्वर शाळेच्या माध्यमातून आंबेजोगाईत संघ विचार रूजविला. त्यानंतर संघाच्या प्रत्येक आयामात प्रारंभी राजाभाऊ दादांचेच नांव येत असे. भारतीय जनसंघ असो, विश्व हिंदू परिषद असो, किसान संघ असो की, सध्याचा भारतीय जनता पक्ष असो, सर्व कामात राजाभाऊ दादांनी आपल्या वयाची पर्वा न करता कार्य केले. पूजनीय राजाभाऊ दादांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेल्या खोलेश्वर विद्यालयाच्या रोपट्याचा आता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या रूपाने विशाल वटवृक्ष झालेला आपणांस पहावयास मिळतो. या सर्व पायातील पत्थर असलेल्या विभूतींचे स्मरण नव्या पिढीने ठेवणे अगत्याचे आहे. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना भागवतराव कांबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सुत्रसंचालन शैलेष कंगळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार साईनाथ उपरे यांनी मानले. प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी, आप्पाराव यादव, वर्षाताई मुंडे, माजी नगरसेवक डॉ.अतुलदादा देशपांडे, सौ.नभाताई वालवडकर, प्रा.रवींद्र पाठक, अनिरूद्ध चौसाळकर, मा.प्राचार्य अशोक पत्की, किरण कांबळे, डॉ.कपील चौसाळकर, डॉ.मुकुंद कुलकर्णी, वरवटी येथील गोशाळेचे प्रमुख ऍड.अशोक मुंडे, विश्व हिंदू परिषदेचे अंबाजोगाई प्रखंडाचे अध्यक्ष साईनाथ उपरे, घाटनांदुर येथील गोशाळेचे प्रमुख पुरी महाराज आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.गोपाळ चौसाळकर आणि सौ.कल्पनाताई चौसाळकर यांना ही सन्मानित करण्यात आले. ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठात अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेले अंबाजोगाईचे भुमिपुत्र डॉ.कपील कमलाकरराव चौसाळकर यांचा विश्व हिंदु परिषदेच्या वतीने या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. कुलकर्णी यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

======================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)