विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने 3 ते 13 मे या कालावधीत पायाभूत स्तर एन.ई.पी.प्रशिक्षण वर्गाचे अंमळनेर (जि.जळगाव) येथे आयोजन
अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी उपयुक्त
=======================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था दिल्लीशी संलग्नित विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान (छत्रपती संभाजीनगर) यांच्या वतीने अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शिक्षक आणि पालकांसाठी पायाभूत स्तर एन.ई.पी.प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 3 मे ते 13 मे 2023 या कालावधी मध्ये अंमळनेर (जि.जळगाव) येथे करण्यात आले आहे.
निसर्गाकडून आपल्यावर पालकत्वाची जबाबदारी सोपविली जाते. हे दायित्व आपल्या क्षमतांचा कस लावणारे असते. प्रत्येक जण आपल्या बालकास सर्वोत्तम ते मिळावे व त्याचे आयुष्य सर्वांगाने सुखी व समाधानी होण्यासाठी धडपडत असतो. अशा बालकाची परिवारातील पहिली तीन वर्षे संपल्यानंतर शिक्षण घेण्यासाठी ते जेव्हा शाळेत जाते तेव्हा शाळेची निवड हा महत्त्वाचा प्रश्न असतो. बालकास आपल्या घरासारखे वातावरण देणारी, त्याच्यावर उत्तम संस्कार करणारी, त्याच्या उपजत क्षमतांचा संपूर्ण विचार करून त्याला हसत खेळत ज्ञान देणारी, आनंदाचे घर असणारी शाळा मिळाल्यास त्या बालकाचा शिक्षणाचा पाया पक्का होण्यासाठी मदत होते. बालकाला शिकविण्याची जशी शाळेची जबाबदारी आहे तशी पालकांची ही असते. बालकाच्या व्यक्तिमत्व विकासाचे आधारस्तंभ म्हणजे शिक्षक. अद्ययावत शिक्षणाने त्यांची परिपक्वता जोपासली जाते. म्हणून शिशु शिक्षण कसे असावे, या संबंधी जे विचार करतात असे शिक्षक, माता व पिता पालक, हितचिंतक प्राथमिक व माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक अशा सर्वांसाठी विद्याभारती दरवर्षी एक प्रशिक्षण व प्रबोधन वर्गाचे आयोजन करते. नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सर्वत्र लागू करण्यात आलेले आहे. या धोरणात शालेय शिक्षणाचे टप्पे 5 + 3 + 3 + 4 असे आहेत. यातील पहिला टप्पा वय वर्षे तीन ते आठ याला पायाभूत स्तर (फाउंडेशन स्टेज) असे म्हटले आहे. या स्तरात पूर्व प्राथमिक , इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी यांचा विचार करण्यात आलेला आहे. मुलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याचा हा टप्पा आहे. त्या दृष्टीने या शैक्षणिक धोरणात प्रारंभिक बाल्ल्यावस्थेत संगोपन आणि काळजी (ईसीसीई) तसेच प्रारंभिक साक्षरता व संख्याशास्त्र (एफ.एल.एन) यांचा विचार केला गेला आहे. तसेच या धोरणात संबंधित ईसीसीई व एफएलएन याबाबत अधिक जाणून घेणे हे शिक्षक शाळा आणि पालक यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. याविषयी सर्वदूर संभ्रमावस्था असल्यामुळे याचे निश्चित असे शिक्षण कसे द्यावे हे या वर्गात प्रात्यक्षिकांसह सांगितले जाणार आहे. तरी देवगिरी प्रांतातील पूर्व प्राथमिक स्तरांवरील शिक्षक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, पालक या प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान (छत्रपती संभाजीनगर) यांच्या वतीने प्रांत अध्यक्ष प्रा.डॉ.विवेक काटदरे, प्रांत मंत्री प्रकाश पोतदार, प्रांत सहमंत्री दिनेश देशपांडे, प्रांत शिशुवाटिका संयोजिका वनमाला कुलकर्णी, सहसंयोजिका सौ.सुरेखा रवींद्र सोनार, वर्ग व्यवस्थाप्रमुख राजेंद्र निकुंभ, संपर्क क्रमांक - भ्रमणध्वनी (9423903245) , वर्ग सहव्यवस्था प्रमुख दिनेश नाईक (9226785795) यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. हा प्रशिक्षण वर्ग खान्देश शिक्षण मंडळ, अंमळनेर संचलित प्रताप महाविद्यालय अंमळनेर (जिल्हा जळगाव) येथे होणार आहे. हा प्रशिक्षण वर्ग निवासी असून त्यामध्ये न्याहारी, भोजन निवास, साहित्य व प्रशिक्षणाची व्यवस्था संयोजकांकडून करण्यात येणार आहे. या वर्गासाठी शुल्क दोन हजार रूपये एवढे ठेवण्यात आलेले आहे.
=======================================
Comments
Post a Comment