आ.नमिताताई मुंदडा यांचा पुढाकार ; अंबाजोगाईतील रोजगार मेळाव्यातून ८२४ तरूणांना मिळाली नौकरी..!
पंडित दीनदयाळ उपाध्याय नौकरी महोत्सव व जॉबकार्ड वाटप मेळाव्यात सुमारे दोन हजार तरूणांनी घेतला सहभाग
================================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र शासन व वसुंधरा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामानातून आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय नौकरी महोत्सव व जॉबकार्ड वाटप मेळाव्यातून तब्बल ८२४ तरूण, तरुणींना नोकरी मिळाली आहे. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २,१९२ उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर ४० कंपन्यांनी सहभाग नोंदवला. बीड जिल्ह्यात प्रथमच एकत्रितरित्या एवढ्या मोठ्या संख्येने तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
केज मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनूसार योग्य ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी या हेतूने आ.नमिताताई मुंदडा यांनी रोजगार मेळाव्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर महाराष्ट्र शासन आणि वसुंधरा सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च रोजी अंबाजोगाईतील खोलेश्वर महाविद्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आ.मुंदडा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २,१९२ उमेदवारांनी नोंदणी केली. आयसीआयसीआय बँक, जस्ट डायल, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, ब्रिटानिया आदी नामांकित कंपन्यांसह एकूण ४० कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या. उमेदवारांच्या अर्जांची जागेवर छाननी करून मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून ८२४ उमेदवारांची निवड विविध कंपन्यांसाठी करण्यात आली. तसेच, या मेळाव्यात जॉब कार्डचेही वाटप करण्यात आले. या कार्डच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या सर्वांना वर्षभर विविध रोजगाराच्या संधी बाबत माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे.
प्रतिवर्षी रोजगार मेळावा घेणार - अक्षयभैय्या मुंदडा
================================
पहिल्याच मेळाव्याला मिळाला प्रतिसाद आणि शेकडो तरूणांना मिळालेली रोजगाराची संधी लक्षात घेतला यापुढे दरवर्षी २३ मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार असल्याची घोषणा वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय मुंदडा यांनी केली. पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात मेळाव्याचे आयोजन करून जास्तीत - जास्त नामांकित कंपन्यांना सहभागी करून घेण्यात येईल असेही मुंदडा यांनी सांगितले.
================================
Comments
Post a Comment