संपूर्ण जगात भारतीय संस्कृती महान - ह.भ.प.रामराव महाराज ढोक






श्रीराम कथेतून आदर्श संस्कारांची शिकवण मिळते - राजेसाहेब देशमुख


अंजनपूर - कोपरा येथील अखंड हरिनाम सप्ताह, पारायण व ज्ञान यज्ञास भाविक भक्तांचा उदंड प्रतिसाद

==============================================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

तालुक्यातील अंजनपूर - कोपरा येथील श्री काळभैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, पारायण व ज्ञान यज्ञास भाविक भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी ह.भ.प रामराव ढोक महाराज म्हणाले की, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण हे भारतीय संस्कृतीसाठी घातक असून आपल्या वैदीक परंपरा, सण - वार हे निसर्ग चक्रावर अवलंबून आहेत. संपूर्ण जगात आपली भारतीय संस्कृती महान असून त्याचे संरक्षण व संगोपन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. गुरूने शिष्याची खुशामत करू नये, अन्यथा शिष्य हा कच्चा राहतो. त्यामुळे प्रसंगी गुरूचीही नामुष्की होते असे सांगून सज्जन एकत्रीत आल्यास दुर्जनाचा नायनाट होईल व रामराज्य प्रस्थापित होईल असा आत्मविश्वास ही प्रसिद्ध श्रीराम कथाकार रामराव महाराज ढोक यांनी कथेत सुंदरकांड समाप्ती प्रसंगी व्यक्त केला. 



अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपूर - कोपरा येथील श्री काळभैरवनाथ मंदीर कलशारोहण सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध श्री राम कथाकार रामराव महाराज ढोक यांच्या श्री राम कथा ज्ञान यज्ञास १७ मार्चपासून सुरूवात झाली होती. या कथा ज्ञान यज्ञाची सांगता शुक्रवार, दिनांक २४ मार्च रोजी झाली. या कालावधीत ह.भ.प.नारायण महाराज, ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री, ह.भ.प.व्याकरणाचार्य अर्जून महाराज लाड, ह.भ.प.किसन महाराज पवार, ह.भ.प.संजय महाराज पाचपोर, ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर, ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.लालासाहेब (नाना) पवार आणि प्रसिद्ध श्री राम कथाकार रामराव महाराज ढोक यांनी आपल्या अमोघ वाणीतून उपस्थित भाविक भक्तांना कृपाशीर्वाद दिले. दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत चाललेल्या श्री राम कथा ज्ञान यज्ञास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसह सुमारे २५ हजार भाविक भक्तांनी अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री राम कथा ज्ञान यज्ञास हजेरी लावत उदंड प्रतिसाद दिला हे विशेष होय. श्री काळभैरवनाथ मंदीर स्थापनेसाठी अंजनपूरचे संजय देशमुख यांनी जमीन दान दिली. त्या ठिकाणी भव्य दिव्य असे श्री काळभैरवनाथ मंदीर उभारले असून कलशारोहण सोहळ्यानिमित्त श्री राम कथा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी कथास्थळी पुर्णवेळ उपस्थित राहून विधीवत पुजाअर्चा व आरती करून राजेसाहेब देशमुख यांनी ह.भ.प.ढोक महाराज आणि ह.भ.प.लालासाहेब (नाना) पवार यांचे आशिर्वाद घेतले. प्रारंभी प्रास्ताविक करताना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख (माकेगावकर) म्हणाले की, रामायणातून आपणांस भावाने भावाशी कसे वागावे, नातेसंबंध, मैत्रिभाव कसे टिकवायचे, सावत्र भाऊ, आई यांच्याशी आदरपूर्वक वर्तणूक कशी ठेवायची याचा अर्थबोध होतो, त्याचप्रमाणे ह.भ.प.लालासाहेब (नाना) पवार यांची तशीच शिकवण आहे, नाना हे मांजरा नदी काठावरील ग्रीनबेल्ट भागातील चाकरवाडी येथील माऊली महाराज यांच्या सारखेच वंदनीय, पवित्र व्यक्तीमत्व आहेत. नाना हे साक्षात माऊलीच आहेत. कारण, पंचक्रोशीतील प्रत्येक माणूस आज ह.भ.प.लालासाहेब (नाना) पवार यांचे आदरपूर्वक दर्शन, मार्गदर्शन आणि आशिर्वाद घेतो. नानांचे जेवढे गुणगान गावे तेवढे थोडेच आहे. नानांचे वागणे सात्विक, परोपकारी आहे, नाना नेहमीच मानवी कल्याणाचा विचार मांडतात त्यामुळे सर्वसामान्य भाविकांतून ह.भ.प.लालासाहेब (नाना) पवार यांचे तोंडभरून कौतुक करण्यात येते असे राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, रामायणात भरताने सावत्र भाऊ श्री राम यांना समर्पित होवून आदर्श राज्य कारभार केला, समाजाने कसे वागावे, बोलावे आणि एकोप्याने कसे राहावे याची शिकवण रामकथेतून मिळते. स्वर्ग - नरक या कल्पना आहेत. आपण जे जीवन जगतो त्यातच खरा आनंद आहे. आदरणीय ह.भ.प.ढोक महाराज यांच्या पवित्र वाणीतून श्री राम कथा ऐकायला मिळाली हे उपस्थित सर्व भाविक भक्तांचे परमभाग्यच आहे. या सोहळ्याला अंजनपूर, कोपरा, आपेगाव, तटबोरगाव, माकेगाव, देवळा, धानोरा, नांदडी, हिवरा, सोमनाथ बोरगाव या सोबतच बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे २५ हजार भाविक भक्त उपस्थित होते, पहिल्या दिवसापासून ह.भ.प.लालासाहेब (नाना) पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. श्री राम कथेतून आदर्श संस्कारांची शिकवण मिळते, त्यामुळे समाजाने श्री राम कथा ऐकून तसे आचरण व अनुकरण करावे, समाज सुखी व समृद्ध होवून शांती, समाधान व आनंदाने जगावा हीच आमची भूमिका काल होती आज आहे, आणि उद्याही ती तशीच राहिल असे प्रतिपादन राजेसाहेब देशमुख यांनी केले. श्री राम कथा ज्ञानयज्ञ सोहळा यशस्वी करण्यासाठी ह.भ.प.लालासाहेब (नाना) पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख, चंद्रकांत देशमुख, संजय देशमुख, प्रा.शिवाजी लकडे, संदीपान देशमुख, भागवत देशमुख, अंकुश देशमुख, देसाई आबा, नागोराव देशमुख, अतुल देशमुख, उध्दव पाटील, बबन देशमुख, संजय येडे, डॉ.विठ्ठल शितोळे, पिंटू गुरूजी, सुर्यकांत पवार, श्रीकांत पवार, डॉ.योगेश देशमुख, महेश देशमुख, निवांत देशमुख, नृसिंह देशमुख, प्रविण देशमुख, गोविंद देशमुख, अमर देशमुख, विश्वनाथ साखरे, विलास इस्थळकर आदींसह अंजनपूर - कोपरा येथील सर्व ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग, महिला भगिनी, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त, भजनी मंडळ, वारकरी संप्रदायाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.


==============================================


Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)