शुद्ध देशी गोवंशाची निर्मिती, जतन व संवर्धन आवश्यक - डॉ.बाबासाहेब ठोंबरे
सिद्ध वळूद्वारे गोवंश पैदास महत्त्वाची - डॉ.नितीन मार्कंडे
कृषी महाविद्यालय लातूर येथे, देशी गोवंश संवर्धन व चारापीक व्यवस्थापन चर्चासत्र संपन्न
================================================
लातूर (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
देवणी, लालकंधारी यासारख्या देशी गोवंशाचे शेतकरी व शेती विकासामध्ये उल्लेखनीय व महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. देशी गोवंश हा स्थानिक बदलणाऱ्या वातावरणाशी नैसर्गिकरित्या एकरूप होणारा असून अंगभूत कार्यक्षमता, उत्पादन क्षमता, प्रजोत्पादन क्षमता व दुग्धोत्पादन क्षमता विकसित केली आहे. हवामान बदलास सक्षमपणे तग धरून उपलब्ध असणाऱ्या चारा पिकावर ओढशक्ती व आरोग्य कायम जोपासले आहे असे निरीक्षणात्मक, संसोधनात्मक व अभ्यासपूर्ण प्रतिपादन कृषि महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. ते कृषि महाविद्यालय, लातूर येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाअंतर्गत 'देशी गोवंश संवर्धन व चारापीक व्यवस्थापन' या शेतीपूरक महत्त्वपूर्ण विषयावर आयोजित केलेल्या एकदिवसीय चर्चासत्रात आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
याप्रसंगी कृषि महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी पुढे बोलताना असे ही प्रतिपादन केले की, शास्त्रज्ञ, पशुपैदासकार व पशुपालक यांनी समन्वयातून व केलेल्या प्रयत्नातून भविष्यात शुद्ध देशी गोवंश हा गुणात्मक व संख्यात्मक दृष्टिकोनातून बळकट व विकसित करावा. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे होते, कार्यक्रमाचे उद्घाटक माजी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ.मारूतीराव ढोबळे हे होते, प्रमुख मार्गदर्शक डॉ.नितीन मार्कंडे, डॉ.मलिकार्जुन हुलसुरे हे होते, डॉ.महादेव जगताप, डॉ.राजकुमार पडीले, कुणाल घुंगार्डे, बच्चेसाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.नितीन मार्कंडे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, पशुपालकांनी पशु पैदाशीसाठी सिद्ध वळू वापरावा व पशुधनास समतोल आहार द्यावा. त्यातून निव्वळ उत्पन्न वृद्धिंगत करून स्वावलंबी बनावे. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.मारूतीराव ढोबळे आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले की, शेतकरी - शेती- पशुधन अशा एकात्मिक पूरक धोरणांचा अवलंब करून पशुपालकांनी आपला सर्वांकष उत्कर्ष साधला पाहिजे. जेणेकरून त्यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावेल व आर्थिक उन्नती ही होईल. याप्रसंगी मल्लिकार्जुन हुलसुरे, डॉ.राजकुमार पडीले, डॉ.महादेव जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी देवणी गोपालक शेषराव सूर्यवंशी यांना 'राष्ट्रीय पशुअनुवंशीक संशोधन संस्था कर्नाल (हरियाणा) यांच्या वतीने "देवणी गोवंश जतन" हा राष्ट्रीय पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दिनेशसिंह चौहान यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ.अनंत शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार डॉ.श्रीकांत गाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.प्रशांत करंजीकर, डॉ.विलास टाकणखार, डॉ.व्यंकट जगताप, डॉ.संघर्षकुमार शृंगारे, हर्षल तिडके, कृष्णा पवार, मोनिका तायडे व साक्षी देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.
==============================================
Comments
Post a Comment