सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेकडून अभिवादन



जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेतील जवानांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहण 

========================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) भारतीय सैन्य दलात कार्यरत राहून आपल्या प्राणाची बाजी लावून, प्रसंगी परकीय शक्तींना आस्मान दाखवून देशाचे रक्षण करणारे जवान हे भारतमातेचे भूषण असतात. अशा वीर सैनिकांचा ज्या, त्या गावांना मोठा अभिमान असतो. अशाच जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेतील जवानांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहण करून अंबाजोगाईत रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


 

अंबाजोगाई शहरात मागील काही वर्षांपासून शिवजन्मोत्सव सोहळा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिलकाका लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारी शिवजन्मोत्सवानिमीत्त सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे विधीवत पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे बहुमान देत याही वर्षी जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेतील जवानांच्या शुभहस्ते व सर्व शिवप्रेमी नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिलकाका लोमटे, जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, ज्येष्ठ विधीज्ञ एॅड.किशोर गिरवलकर आदींसह विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर, शासकीय व प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबाजोगाईत मागील तीन ते चार दिवसांपासून शिवजन्मोत्सवानिमीत्त रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. रविवारी अंबाजोगाईत भव्य मिरवणूक व रॅली काढण्यात येणार आहे. याचे दिमाखदार आयोजन सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील जे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श सर्व नव्या उमेदीच्या तरूण पिढीने घ्यावा, या विधायक हेतूने आजी - माजी सैनिकांच्या शुभहस्ते रविवारी शिवध्वजारोहण करण्यात आले. तसेच जयंती उत्सव समितीकडून आजी - माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळेस जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य हे संस्थेने निश्चित केलेल्या गणवेशात सर्व्हिस मेडल लावून उपस्थित होते. आजी - माजी सैनिकांचा उत्साह पाहून वातावरण भावूक झाले होते. जिजाऊ वंदनेनंतर उपस्थित शिवभक्तांनी "छत्रपती शिवाजी महाराज की, जय", "भारत माता की, जय", "जय जिजाऊ, जय शिवराय" असा गगनभेदी जयघोष केला. देशभक्तीच्या वातावरणात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप, उपाध्यक्षा महानंदाताई पोखरकर, सचिव कॅप्टन अभिमन्यू शिंदे, कोषाध्यक्ष नायक कुंडलीक गव्हाणे, संचालक कॅप्टन शेख उस्मान, कॅप्टन नंदकुमार जगताप, नायक बाबासाहेब केंद्रे, हवालदार शिवाजी ठोंबरे, हवालदार चंद्रकांत विरगट, हवालदार सय्यद ख्वाजा नजिमोद्दीन, सिंधूताई निर्मळ, नायक सटवाराम वाघमारे, दिलीप निकम, नायक यशवंत व्हावळे, नायक भगवान कांबळे, नायक अनंत गवळी, सुभेदार आबासाहेब हाके, योगेश पोखरकर, हनुमंत गडदे, नायक सूर्यकांत मुंडे, सुभेदार गोपीनाथ काळे, हवालदार ज्ञानेश्वर कदम, हवालदार महादेव पतंगे, नायक विजयकुमार तपसे, हवालदार राहूल नेहरकर, सुभेदार मेजर ताराचंद मस्के, नायक बाबुराव पवार यांच्यासह जय जवान आजी - माजी सैनिक संस्था पदाधिकारी, संचालक मंडळ, सदस्य आणि कुटुंबातील महिला, पुरूष, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


महाराष्ट्रातील आदर्श शिवजन्मोत्सव :


भारतीय सिमांचे रक्षण करणाऱ्या बहाद्दर आजी - माजी सैनिकांना दरवर्षी आपुलकीने बोलावून शिवजन्मोत्सवानिमीत्त सैनिकांच्या हस्ते शिवध्वजारोहण करण्यात येते, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिलकाका लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून महाराष्ट्रातील एक भव्य - दिव्य असा आदर्श शिवजन्मोत्सव सोहळा अंबाजोगाईत साजरा होत आहे. त्याबद्दल जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिलकाका व समिती पदाधिकारी यांचे जय जवान आजी - माजी सैनिक संस्था पदाधिकारी, सदस्य आणि कुटुंबाकडून हार्दिक अभिनंदन..!


- कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप

(अध्यक्ष, जय जवान आजी - माजी सैनिक संस्था.)


======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)