कृषि विज्ञान केंद्र डिघोळआंबा येथील महिला शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
भरड धान्याचा आहारामध्ये समावेश करावा - समृद्धी दिवाणे
========================
(लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र डिघोळआंबा येथे ‘महिला शेतकरी मेळावा’ आणि भरडधान्य आधारित पोषण आहार स्पर्धा संपन्न झाली. कृषि विज्ञान केंद्र डिघोळआंबा येथील महिला शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी मंचावर डॉ.उपेंद्र कुलकर्णी (प्रकल्प प्रमुख, दीनदयाल शोध संस्थान बीड), समृद्धी दिवाणे - काळे (गटविकास अधिकारी, अंबाजोगाई), संध्याताई कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्त्या, औरंगाबाद), गोविंद ठाकूर (मंडळ कृषी अधिकारी, अंबाजोगाई), वैशाली देशमुख (शास्त्रज्ञ गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, गांधेली औरंगाबाद), नभाताई वालवडकर (सामाजिक कार्यकर्त्या, अंबाजोगाई) व डॉ. वसंत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई) हे मान्यवर उपस्थित होते.
डॉ.उपेंद्र कुलकर्णी म्हणाले की, मेळाव्यामध्ये सांगितलेल्या तंत्रज्ञानाची व विविध योजनांची महिला शेतकऱ्यांनी लाभ घेवून स्वावलंबी होण्याची गरज आहे. बाजारपेठ व विक्री व्यवस्थेचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करून धान्य उत्पादनावर मूल्यवर्धन करून त्याच्या साठवणुकी बाबतही चालत असलेले संशोधन ग्रामीण भागापर्यंत येण्याची गरज त्यांनी विषद केली. समृद्धी दिवाणे - काळे यांनी महिलांनी राळ, नाचणी, भगरीचा भात तसेच इतर पोषण आहाराची निर्मिती करून स्वतःच्या कुटुंबात वापर करावा असे सांगून पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती या प्रसंगी दिली. गोविंद ठाकूर यांनी तृणधान्य हे सहनशील पिक असून त्यास कमी निविष्टांची गरज असल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते असे सांगितले. उत्पादित धान्यास प्रकिया करून मूल्यवर्धन साध्य होऊ शकते असे सांगून त्यांनी यासाठी कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. महिला बचत गटांनी भरड धान्याची विविध पाच उत्पादने निर्मिती करून पॅकिंग कौशल्य वापरून विक्रीस उपलब्ध करावी असे आवाहन संध्या कुलकर्णी यांनी केले. या उत्पादनाची शहरी बाजारपेठेमध्ये विक्री होण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. विविध भरड धान्य शरीरांना ऊर्जा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व सूक्ष्म खनिजे आदी पोषकतत्वे प्रदान करतात. कॅन्सर उती निर्मिती प्रतिबंधक व मधुमेहासाठी उपयुक्त असे रोग प्रतिकारशक्तीदायक भरड धान्याची व त्यापासून तयार केले जात असलेल्या विविध व्यंजनाची माहिती वैशाली देशमुख यांनी दिली.
सुदृढ समाजासाठी महिलांनी आपल्या पाल्याला समजूतदार बनवून व्यवहारिक ज्ञान द्यावे व लहानपणापासूनच सुदृढ आहार घेण्याचे सवय लावावी असे आवाहन नभा वालवाडकर यांनी केले. भरड धान्याचा आहारातील समावेश यास विशेष महत्व आहे. भरड धान्याचे उत्पादन कमी होत असून आजच्या बदलत्या जीवनशैलीत आहारातूनही लोप पावत आहे. महिला शेतकऱ्यांना भरड धान्याचे महत्व पटवून देण्यासाठी शासनाने 2023 हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरा करण्याचे ठरवल्याचे डॉ.वसंत देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात सांगितले.
याप्रसंगी आयोजित पोषण आहार स्पर्धेमध्ये बाजरी लाडू, बाजरी खिचडी, राजगिरा लाडू, धपाटे, ज्वारी कापोडी, गुळ कापणी व ज्वारी उपमा यासारखी विविध व्यंजने अनेक महिलांनी तयार करून मांडले होते. पोषण आहार स्पर्धेमध्ये विजयी महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ॲग्रोवन महिला युवा उद्योजक शेतकरी पुरस्कार प्राप्त केंद्राचे संपर्कित महिला शेतकरी लक्ष्मी बोरा (रा.सिंधी ता.केज) यांचा केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्राच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ रोहिणी भरड यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी मानले. याप्रसंगी अंबाजोगाई व केज तालुक्यातील विविध गावातील महिला शेतकरी यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
=======================
Comments
Post a Comment