साहित्यिकांनी शोषणाविरूध्द आवाज उठवावा - संमेलनाध्यक्ष कवी दिनकर जोशी
पाचवे एकता मराठी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन
साहित्यातून नवसमाज निर्मिती होते
- उद्घाटक आ.विक्रम काळे
========================
अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी- लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
आता साहित्यीकांना गरीब,शोषित आणि वंचितांची भाषा बोलावी लागेल. त्यांचे प्रश्न, वेदना, साहित्य समाजासमोर आणावे लागेल. श्रीमंतांची भाषा ही शोषणाची आहे. शोषणाविरूध्द साहित्यिकच आवाज उठवू शकतात. साहित्यीकांनी ही जबाबदारी पार पाडावी. असे आवाहन संमेलनाध्यक्ष दिनकर जोशी यांनी केले. ते एकता फाउंडेशन शिरूर कासार (जि.बीड) आणि शांतीवन, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात बोलत होते.या संमेलनाचे शानदार उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दिनांक 26 डिसेंबर रोजी करण्यात आले.
या संमेलनाचे अध्यक्षपद अंबाजोगाईचे प्रख्यात कवी दिनकर जोशी हे भूषवित आहेत. 26 व 27 डिसेंबर रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी या संमेलनाचे उद्घाटन शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते व स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते दिपक नागरगोजे, साहित्यीक अनंत कराड, कोल्हे आदींसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी श्रध्देय बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार व स्व.विजयकुमार ठाकूर जीवनगौरव पुरस्कार तसेच राज्यस्तरीय पुरस्कार आणि राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे ही वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना संमेलनाध्यक्ष दिनकर जोशी म्हणाले की, आता साहित्यीकांना गरीब,शोषित आणि वंचितांची भाषा बोलावी लागेल. त्यांचे प्रश्न, साहित्य समाजासमोर आणावे लागेल. श्रीमंतांची भाषा ही शोषणाची आहे. शोषणाविरूध्द साहित्यिकच आवाज उठवू शकतात. साहित्यीकांनी ही जबाबदारी पार पाडावी. असे आवाहन करून संमेलनाध्यक्ष जोशी म्हणाले की, शोषण करणारा वर्ग आणि शोषण करून घेणारा वर्ग आज सर्वच जाती धर्मात आढळून येत आहे. त्यामुळे शोषणाविरूध्दची लढाई आता जातीय राहिलेली नाही. समाज संघटन करताना आता आपल्याला भाषा बदलावी लागेल. आक्रमक भाषा आता चालणार नाहीत, तर ती भाषा सलोख्याची, सौहार्दाची आणि परिवर्तनाची असली पाहिजे, तरच हा समाज संघटित होईल. त्याची सुरूवात साहित्यामधून होणे आवश्यक आहे. भूमिका असलेले नायक साहित्यातून घडवावे लागतील. असे सांगून संमेलनाध्यक्ष जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र धर्म काय आहे हे सांगितले, संतांची कामगिरी विषद करताना त्यांनी सर्व संतांचा उल्लेख केला. शौर्याबाबत बोलताना यादव कुळातील राजे, विजयनगरचे साम्राज्य, छञपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज ते पेशवे यांचे विविध संदर्भ दिले. लोकहितवादी, आगरकर, महात्मा ज्योतीराव फुले, छञपती शाहू महाराज, महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याचा आपल्या भाषणातून गौरव करून राजकीय दिशा देण्यात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ते आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान असल्याचे जोशी म्हणाले, यापुढील काळात तरी जातीय अस्मिता आणि राजकीय कारणांसाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर होवू नये, साहित्य संमेलन हे फक्त साहित्यीक व कलावंत यांचीच राहीले पाहिजे अशी अपेक्षा पाचवे एकता मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिनकर जोशी यांनी व्यक्त केली. तर उद्घाटक म्हणून बोलताना शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले की, ग्रामीण भागात अशा साहित्य संमेलनाची नितांत आवश्यकता आहे. साहित्य हा समाजाचा आरसा आहे. समाजातील नेमकेपणा साहित्य टिपते, समाजाला, नव्या पिढीला दिशा देण्याचे काम साहित्य करते. साहित्यातून नवसमाज निर्मीती होते. संमेलनाध्यक्षपदी दिनकर जोशी यांची सार्थ निवड करण्यात आल्याबद्दल आ.काळे यांनी समाधान व्यक्त केले. स्वागताध्यक्ष दिपक नागरगोजे यांनी संमेलन आयोजनाबाबत माहिती देवून आपली विधायक भुमिका विषद केली. यावेळेस पद्मश्री डॉ.कोल्हे यांचे ही समायोचित भाषण झाले. यावेळेस व्यासपीठावर किरण सगर, कुंडलिक आतकरे, महेबूब शेख, शिवाजीराव पवार, सौ.चंपावती (काकी) पानसंबळ, सौ.भारती भोसले, सौ.उषाबाई सरवदे, सुरेश राजहंस, आदित्य जीवने, श्रीराम बेंडे, अशोक काकडे, महादेव जायभाये, सिध्दार्थ माने, डॉ.अशोक गवळी, जमीर शेख, मधुकर सानप या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्तावना अनंत कराड यांनी केली. तर सुञसंचालन कैलास तुपे यांनी करून उपस्थितांचे आभार गोकुळ पवार यांनी मानले. या साहित्य संमेलनात विद्यार्थी, शिक्षक, रसिक, श्रोते, महिला, युवक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शिक्षण, पञकारीता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. व्यंगचित्रकार सुहास पालिमकर, व्यंगचित्रकार दिपक महाले यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विशेष सन्मान सोहळा, महाराष्ट्राची लोकधारा, लेखक आपल्या भेटीला, मुलाखत, परिसंवाद, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, पुस्तक प्रकाशन, सन्मान भुमिपुञांचा, समारोप (ठराव वाचन) आदी विविध विषयांवर या साहित्य संमेलनात मौलिक चिंतन होणार आहे.
=======================
Comments
Post a Comment