सुप्रसिद्ध गझलकार प्रा.डॉ.मुकूंद राजपंखे यांचा चिंतनपर लेख : "संयमाचा परीघ"


सुप्रसिद्ध गझलकार प्रा.डॉ.मुकूंद राजपंखे यांचा चिंतनपर लेख : "संयमाचा परीघ" मराठी वाचक, रसिकांसाठी.... 


"वस बुडविणार आहोत का आपण माणुसकी निर्माण करणाऱ्या शिक्षणाचा ..?"

--------------------------

■ आपला विरोध कशाला आहे नेमका ? 

आपण कुणा विरोधात लढा उभारू पहात आहोत नेमके ?

आपला शत्रू कोण आहे नेमका आणि आपला मित्र कोण आहे नेमका ?

आपण का लढतो आहोत आपापसातच ? कोणाविरूद्ध आहे आपण बंड पुकारलेले ? तो जो आज याच्या विरुद्ध लढ म्हणून उचाटनी देतो कालांतराने तो त्याच्या भकीला बसलेला असतो. क्षणार्धात बदलत जात आहेत समीकरणं !

आपण ठाम पणे कुणाच्या बाजूनं जायचं ? भुजा आहेत, आपल्याला आहे का मुळात बाजू ? का वागंत असतील माणसं असे ? कोण बदलतो माणसांच्या मनाचा कौल ? हैराण करून सोडणारे प्रश्न आहेत ना ? मुळात हे आहे काय आणि असं का असतं ? इतिहास सांगतो ओरडून याने त्याचे पाय चाटले आणि त्याने त्याचे पाय छाटले. याला सपोर्ट करणारे कोण होते आणि मग त्याची बाजू न्यायाची म्हणणारे कोण होते ?

नितीलाही आहेत सपोर्टर्स आणि अनितीचेही आहेत पाठीराखे.

आपल्यातल्या कुणाला विचारलं म्हणजे होईल कन्फर्म की कुठली बाजू आहे रास्त ? हे चांगलं तर मग ते का नाही ? ते चांगलं तर मग हे का नाही ? या आणि अशा प्रश्नांनी चर्चा बहरायला हव्यात.तान तणाव निवळायला हवेत. माहित नसल्यामुळं अर्थात अज्ञानामुळं एवढं सगळं वाट्टोळं झाल्याचं आठराव्या शतकातंच महात्मा फुलेंनी सांगून ठेवलं आहे. आपल्या आकलनाच्या आणि अर्थातच आचरणाच्या पातळीवर आपण ते कधी आणलं नाही. नळी फुंकिली सोनारे आणि इकडुन तिकडे गेले वारे' अशी गत झाली आहे.


महाभारत अनेकदा ऐकलं आपण कधी टी व्ही वर कधी व्याख्याणातुन. ज्ञानेश्वरांनी ते सामान्य माणसांनाही कळावं यासाठी आयुष्य पनाला लावून ते प्राकृतमधेही आणलं मोजकं तितकंच. अगदीच हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला पुन्हा धनुष्य रोखायला लावणारा तो महाभारतातला मजकुर आहे ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हटलं आहे. समोर आजोबा आहेत, चुलतभावंडं आहेत, आप्त स्वकीय आहेत. त्यांच्यावर बानवृष्टी कशी करू हा त्याला पडलेला प्रश्न आहे. ते मेले तर माझेच आहेत आणि हे मेले तरी माझेच आहेत. मग माझे कोण आणि ते कसे माझ्याच विरोधात दंड ठोकून उभे आहेत ? हा संभ्रम कृष्ण ज्या पद्धतीने दूर करतो, ती पद्धध समजून घेतली पाहिजे. ते मनातलं द्वंद्वं समजून घेतलं पाहिजे. महामानव बाबासाहेब म्हणाले मी राम आणि कृष्णाला देव माणणार नाही. बाबासाहेबांनी त्यांचं माणुस असणं कुठं नाकारलं आहे ?बरं हे सगळं सांगण्यापूर्वी त्यांनी किती आणि काय काय वाचन केलं आहे ? याचा साधा विचारही करायचा नाही का आपण ? चक्क वाङमयाचं वाचनच सोडून दिलेले चळवळीतल्या मंडळींना हे वाचायलाही जड जाणार आहे याची नम्र जाणिव आहेच मला.


मुद्दा हा आहे की, आपले तुपले कुणाला म्हणायचं आणि का ? आधार जातीचा द्यायचा की धर्माचा ? या चळवळीचा द्यायचा की त्या ? अशा सगळ्या प्रश्नांचा समाचार घ्यायला आपण कधी तरी प्लेटो आणि  अरिस्टॉटलच्या चर्चा वाचाव्या लागतील. कधीतरी मिलींदचे प्रश्न वाचावे लागतील. कधी तरी तुकोबाच्या चरीत्राला हात घालावा लागेल. कधी तरी राजकुमार गौतमाला पडलेल्या प्रश्नांचा उलघडा वाचावा लागेल. कधीतरी षडरिपू काय आहेत आणि काय काम करतात हे पहावं लागेल. कधीतरी व्याख्यानं ऐकावे लागतील. कधी तरी ग्रंथालयात पायधूळ झाडावी लागेल. कधी तरी रचून ठेवलेल्या पुस्तकांची दया यावी लागेल आपल्याला ? अज्ञानामुळं जर इतकं सगळं वाटोळं होत असेल तर मग आहे ते ज्ञान धूळ खात पडलंय ती धूळ झटकावी लागेल. मेंदूवर साचलेला मळाचा वट खरडून काढावा लागेल. गांभीर्यीनं घ्यावं लागेल आपल्याला पुस्तकांनी घटका मोजणारं ज्ञान. कळत्या माणसांचा नाद करावा लागेल.सद्गुणी लोक तुमचे सन्मित्र असायला कांही हरकत नसावी. ज्यांच्या आचार विचारातून आपले संभ्रम निघून जातील आणि पुन्हा आपलं जगणं प्रवाही होवू शकेल, असा गातावळा आपला असायला हरकत नसावी.


काळ कुठलाही असो, 'शकुनी' आहेतच. 'कैकयी' आहेच. कुटाने आहेतच. आपल्या भवतालातल्या कैदाशा ओळखता यायला हव्यात आपल्याला. आपल्या भवतालातलं भयंकर अघोरीपण कळलं नाही आपल्याला तर होणारंच आपलं शोषण आणि बळीच पडणार आपण. चांगल्या-वाईटातला भेद कसा सांगणार आहोत आपण ? आप - परभावाची जाणिव कशी सांगणार ? कोणत्या कसोट्यांवर पारखायचं आपण भलं-बुरं, चांगलं - वाईट, यौग्य-अयौग्य, खरं - खोटं ? लोभी लोक, लालची लोक, ल्हाचर लोक, मध, मोह, माया, मत्सरांनी ग्रासलेली मंडळी ओळखायची कशी ? आपल्याच रक्ता- मासाचे म्हणून, जाती धर्माचे म्हणून, आपल्यातल्याच गटा - तटाचे म्हणून सांभाळायचे का ? आपल्या जगण्याचा वास उठला आहे हे ओळखायचं कसं ? 'ही पुस्तकं वाचू नयेत', 'त्याला हात लावू नका', अशा बावळट बंधनांनी तर नासवली नाही ना आपण आडी ? महात्मा गांधींच्या तीन माकडांचे काय घेतले आहेत अर्थ आपण ? साने गुरूजींचं आणि आपलं काहीच नाही का घेणं देणं ? का बरं आत्महत्या केली होती साने गुरूजींनी ? महायुद्ध जगावर लादून, लाखो ज्यु लोकांची कत्तल  करुन जग जिंकायला निघाला होता ना हिटलर ? मग त्यानं का बरं गोळ्या झाडल्या स्वत:वरंच ? 'हाव' जिंकायला हवा होता ना ? 'द्वेष' जिंकायला हवा होता ना ? 'क्रोध' जिंकायला हवा होता ना ? 'मोह' जिंकायला हवा होता ना ? 'मत्सर' जिकायला हवा होता ना ? नाही ना ? यातल्या कुणालाच सुख, शांती, समाधान मिळालं नाही. अखेर मेलेच ना ? का राहिला कुणी देहानं अजरामर ? देह जाणारंच. जातोच. आणि तरी माणुस एवढा लालची, एवढा कुटानेखोर, एवढं छक्के-पंजे करू कसा ? का हा एवढा सत्तेचा हाव ? संपत्तीचा हाव ? जगु द्या ना रे बाबा माणसांना आनंदानं ? का ओढायलात सगळं आपल्याच पोटावर ? किती तरी भुका आहेत तुम्हाला ? कशाला हवीत तुम्हाला इतकी घरं ? कशाला हवे आहेत इतके प्लॉट्स ? कशाला हव्यात इतक्या गाड्या ? कशाला हवेत इतके रानं ? इतके दुकानं ? इतक्या संस्था ? इतके पदं ? इतकी प्रसिद्धी ? इतका पैसा ? इतके कपडे ? इतके चपला बुटं कशाला हवे आहेत ? जरा भवतालाकडं बघा राव ? थंडीनं काकडून मरायलेत माणसं, ना अंथरायला आहे कांही त्यांच्याकडं ना पांघरायला ? कुणं पळवली त्यांची भाकर ? कुणं मारले त्यांचे हक्क ? कुणी लुबाडलं त्यांच्या हिश्याचं सुख ? कधी पडंत नाही प्रश्न, की का बरं ही पालात रहात असतील गोर-गरीब माणसं ? रस्त्याच्या कडंला का बरं मांडली असेल तीन दगडाची चूल ? तुम्हाला कसाच घास गिळंत असेल, कमालच आहे.


तुम्हाला कोरडी स्वप्नं पडून उपयोग नाही.

तुम्ही ज्या दिवशी आपल्या जन्माचं प्रयोजन समजून घ्याल, तो दिवस धन्य. कुणाचं खपाटीला गेलेलं उपाशी पोट पहाल आणि भूक मरून जाईल तुमची, तो दिवस धन्य.ज्या दिवशी कुण्या निराधार आजीची, आजोबाची काटी व्हाल तुम्ही तो दिवस धन्य. यासाठी तुमचा कोणी तरी जबर आपमानच करायला पाहिजे का तुम्हाला अक्कल यायला ? ज्या दिवशी तुम्ही जात, धर्म, लिंग, भाषा,वय,प्रांत आदी सीमा पार करून आपुलकी जिव्हाळ्याची वागणुक द्याल एकमेकांना तो दिवस धन्य.षज्या दिवशी तुम्ही राग, लोभ, द्वेश, मोह, माया, मत्सर आदी 'षडरिपुं'वर मात कराल, विजय मिळवाल तो दिवस धन्य !


तुम्हाला 'विकार मुक्त करणं' हेच तर काम आहे ना शिक्षणाचं, पण, त्याचीच काय हेळसांड लावली आहे सरकारांनी. ना नीट शाळा चालू दिल्या जात आहेत, ना महाविद्यालये.जिथून तुम्हाला शहाणं करून, विवेकी करून, तुमचा सर्वांगीण विकास करुन जीवन जगण्यासाठी चांगला जबाबदार नागरीक म्हणून समाजात पाठवायचं आहे, त्याच शिक्षण व्यवस्थेच्या पायात सुरूंगं लावली चालली आहेत. अवघडंच होत चाललंय दिवसेंदिवस.गेली विसेक वर्ष शाळा महाविद्यालये विनाअनुदानावर चालली आहेत, ना कसल्या सुविधा ना शिक्षकांना पोटभर पगार.कसा करायचा समाज समृद्ध आणि कसं व्हायचं समृद्ध सर्वार्थानं ? एका कडंकुन कड लागल्यावरंच, सगळंच संपल्यावर करायची आहे का सुरूवात कांही चांगलं करायची ? त्या आधी पावलं उचलली तर कांही बिघडेल का आपलं ? गावोगावच्या शाळा महाविद्यालयांना वाळवी लावली जात आहे, हे कळंत नाही का आपल्याला.आम्ही अनुदान देवू शकत नाही म्हणंत आहे सरकार आणि दुसरीकडं खैराती वाटणं थांबत नाही, हे ही बघतोच आहोत की आपण.देशाचा एक मोठ्ठा गठ्ठा अनपड, अकुशल, अस्वस्थ ठेवून कसली प्रगती करणार आहोत आपण ?


कधी तरी गांभिर्यानं घेणार आहोत की नाही आपण शिक्षणाला ? षडरिपूंवर मात करायला शिकवणार आहोत की नाही लेकरांना ? जगातले तमाम धर्म नाहीत का ओरडून सांगत... 'तृष्णा हेच आपल्या दु:खाचं कारण आहे'. मग...नकोच आहे का आपल्या देशाला 'सद्गुणी नागरीक निर्माण करणारं शिक्षण' ? कुठवर कवटाळंत बसणार आहोत आपण आपापली बारकुली द्वेष, इर्षा, मत्सर पेरणारी वर्तुळं ? 'व्यापक जनहिताचा विचार' कधी करणार आहोत की नाही आपण ? बुद्धीच्या अंगानं कष्टाळू माणसं नकोच आहेत का समाजाला ? कनवाळू काळीज निर्माणाच्या कार्याला बळ नको का द्यायला हवं आपण ? कठोर काळजाच्या निष्ठुर माणसांनी चक्क माणुसकीच मारुन टाकली आहे.आपल्या घरा-दारात, गावात - देशात दया, माया, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी उबद-याच येवू द्यायची नाही का ? तुमच्या काळजाला पाझर कसा फुटणार जर तुम्ही कधी कुणाचं दु:खंच जवळ बसून, ऐकून घेतलं नाही ?


वस बुडविणार आहोत का आपण माणुसकी निर्माण करणाऱ्या शिक्षणाचा ?


▪डॉ.मुकुंद राजपंखे,

अंबाजोगाई,(जि.बीड) 

संपर्क : 9881294226


=========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)