"वर्तमानातील भूतकाळाचे संदर्भ आणि भविष्याच्या परिणामांची उकल करणारे : कवी दिनकर जोशी"
एकता फाउंडेशन शिरूर कासार (जि.बीड) आणि शांतीवन, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक 26 आणि मंगळवार, दिनांक 27 डिसेंबर रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्ष कविवर्य दिनकर जोशी यांच्या साहित्य विषयक कार्याची ओळख करून देणारा प्रस्तुत लेख वाचकांसाठी देत आहोत.
================
"अंबाजोगाई ही मराठीचे आद्यकवी मुकूंदराज, प्रकांड पंडीत सर्वज्ञ दासोपंत यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी, मराठवाड्याचे पुणे असा ही अंबानगरीचा नांवलौकीक आहे, महाराष्ट्राला नवा विचार आणि दिशा देण्याचे काम या शहराने कायमच केले आहे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व साहित्य क्षेत्रात चळवळीला बळ देण्याचे कार्य अंबानगरीेेचे भुमिपुत्र आज विविध क्षेत्रात अव्याहतपणे करीत आहेत, अंबाजोगाईच्या सशक्त कवितेचा वारसा जोपासण्याचे, पुढे नेण्याचे काम जी काही मोजकी साहित्यिक मंडळी करीत आहेत त्यात दिनकर वासुदेवराव जोशी हे मराठवाड्यातले आघाडीचे कवी म्हणून सर्वदूर ओळखले जातात."
दिनकर जोशी हे मराठी भाषेतील एक लोकप्रिय कवी व "साहित्य प्रणाली" मासिकाचे संपादक आहेत. जोशी हे आज मराठवाड्यातले आघाडीचे कवी म्हणून ओळखले जातात. "आयुष्याचे अवघड ओझे" हा जोशी यांचा काव्यसंग्रह २०१३ साली प्रकाशित झाला, मानवी जीवनाच्या विविध छटा, दु:ख, वेदना, दुष्काळ, मनातील नेमके भाव टिपणारा, "ती" चे मनोविश्व उलगडणारा काव्यसंग्रह म्हणजे "आयुष्याचे अवघड ओझे" होय, अस्वस्थ भवतालास कविला सामोरे जावेच लागते, कारण ते अगदी स्वाभाविकच आहे. अतिशय शांत आणि संयमी स्वभावाच्या दिनकर जोशी यांनी महाराष्ट्राला आपली एकेक कविता ऐकवता-ऐकवता एकूणच मराठी कवितेवर प्रेम कसे करायचे हे शिकवले. "सोनियाचा पिंपळ" पासून सुरू झालेला जोशी यांच्या सशक्त कवितेचा प्रवास "दुष्काळी हिंदोळे" पर्यंत पोहोचला, जोशी सर हे कवितेवर मनापासून प्रेम करणारे मनस्वी व्यक्तिमत्व आहे. जोशी हे एक उत्तम अध्यापक आहेत, तसेच ते एक मर्मग्राही रसिक आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला कवितेची आवड निर्माण झाल्याशिवय राहत नाही. कविता हा मनाचा ठाव घेणारा असा साहित्यप्रकार. शब्दांना नवे अर्थ प्राप्त करून देत, आशय संपन्न, जगात सर्वत्र आवडला जाणारा. जोशी सरांनी आपल्या विविध गेय रचनांमधून नव्या पिढीला मराठी कवितेवर मनापासून उत्स्फूर्त दाद (वन्समोअर) द्यायला भाग पाडले. याचा मी स्वता:ही साक्षीदार आहे. कवितेतून नेमके मांडणे व रसिक श्रोत्यांची वाहवा मिळविणे हे सोपे काम नाही. पण, दिनकर जोशी यांनी हे लिलया साध्य केले आहे. जोशी यांना कवी आणि कविता महत्त्वाची वाटत आली आहे. म्हणूनच त्यांनी प्रमुख संयोजक म्हणून अंबाजोगाई शहरात एॅड.आर.डी.देशपांडे प्रतिष्ठान मार्फत साहित्यिक उपक्रम आयोजित करून मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, ज्येष्ठ कवी प्रा.फ.मुं.शिंदे, प्रा.प्रशांत मोरे, संदीप खरे आणि शाहीर संभाजी भगत या मान्यवर लोककवींना आद्यकवी मुकूंदराज पुरस्कार देवून सन्मानित केले. मराठीतून लिहीणा-या कविमित्रांच्या कविता समजावून घेण्यासाठी जोशी यांनी अंबाजोगाई शहरात एका स्थानिक संस्थेच्या माध्यमातून आद्यकवी मुकूंदराज काव्यसंमेलन हा उपक्रम सुरू केला आहे, एक आस्वादक समीक्षक म्हणून ही जोशी यांनी वर्तमानाला भिडणारी व भेदणारी कविता लिहीली आहे, ते आपल्या कवितांकडेही तटस्थ नजरेने पाहतात हे विशेष होय. जोशी यांच्या "आयुष्याचे अवघड ओझे" या कवितेने आयुष्याकडे पहाण्याची नवी दृष्टी दिली. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळापासूनच खरे तर जोशी हे काव्यलेखनाकडे वळले. तसे तर आर्वी ता शिरूर कासार येथे होणा-या नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिनकर वासुदेवराव जोशी हे मागील 30 वर्षांपासून काव्यलेखन करीत आहेत. त्यांना आद्यकवि मुकुंदराज काव्यरत्न पुरस्कार, कै.सुभद्राबाई बिवरे, पंचरत्न पुरस्कार यासह विविध पुरस्कार प्राप्त असून त्यांनी सासवड आणि उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जागतिक मराठी आकादमीचे साहित्य संमेलन, पुणे फेस्टिव्हल येथे सलग पाच वर्षे आणि मराठवाडा साहित्य संमेलनासह महाराष्ट्रातील विविध संमेलनातून सहभागी होत काव्यगायन करून सतत 15 वर्षांपासून अंबानगरीचा नांवलौकिक वाढविला आहे. त्यांचा "आयुष्याचे अवघड ओझे" हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन (1995), मायबोली साहित्य संमेलन, सद्भावना सांस्कृतिक समारोह, अंबाजोगाई साहित्य संमेलन, बालझुंब्बड आदींचे यशस्वी आयोजन, संयोजन, संकल्पना, सहभाग व मार्गदर्शन करून अंबाजोगाईसह मराठवाड्यातील साहित्य चळवळीला बळ, प्रेरणा आणि नवा आयाम देण्याचे कार्य दिनकर जोशी हे आजपावेतो करीत आहेत. विविध सामाजिक व साहित्य संस्थांचे ते पदाधिकारी ही आहेत. सामाजिक बांधिलकीतून अंबाजोगाई शहरात विविध साहित्यिक उपक्रम राबवून मराठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर कविंना सन्मानित करण्यात जोशी यांचा मोठा पुढाकार राहिला आहे. दिनकर जोशी हे योगेश्वरी शिक्षण संस्थेत सहशिक्षक आहेत. शिक्षण तसेच साहित्यासोबतच त्यांनी 25 वर्षे पञकारीता केली आहे. त्यांना कै.अनंतराव भालेराव शोध पञकारीता पुरस्कार, भिकाभाऊ राखे आदर्श पञकारीता पुरस्कार व कै.सा.ऊ.भारजकर शोध पञकारीता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. "आयुष्याचे अवघड ओझे" या कवितासंग्रहातील सर्वच रचना या चिंतनपर आहेत, जीवनाला स्पर्श करणाऱ्या व नवा अर्थ देणाऱ्या आहेत. जोशी यांच्या कवितेवर कुणाचा ही प्रभाव दिसून येत नाही, तर त्यांची कविता ही स्वतंत्र आणि वेगळ्या वाटेने जाणारी आहे, मानवी नाते संबंध, भावना, संसार, आक्रोश, भय, धर्म, राजकारण, वर्तमान यावर परखड भाष्य जोशी यांनी केले आहे, वास्तवाला भिडणा-या कविवर्य दिनकर जोशी यांच्या काही काव्यओळी आपल्या माहितीस्तव,
"धर्माच्या नावानं लक्तरं झेलताना आपापलं आयुष्य जखमांनी पेलताना माणसाच्या मेंदूला थोडा गारवा दे, परमेश्वरा असलाच तर विसावा दे.
(पावत्या आणि पट्टीसाठी)
************
स्वार्थाचं शेत फुलवायचं फक्त धोरणं वेगवेगळी एकमेकांना वापरण्याची फक्त कारणं वेगवेगळी (आयुष्य झाडताना)
*****************
मनातले सारे आक्रोश कागदावर उतरवले कचऱ्याला वाढवलं
जगावरचा सारा राग मी ओकला शब्दांतून.
आयुष्यभर कचऱ्यानं ! (कचऱ्यासाठी कचरा)
*****************
सारेच प्रश्न आता, आहेत भोवताली पुसतोस तू कशाला, आता मला खुशाली
जखमा विकून त्यांनी, जगणे खुशाल केले सुकल्या झोपड्यांना, आता कुणी न वाली (प्रश्न)
*****************
काय देवाची सांगू कहाणी त्याचे भक्त सैतान झाले तुझ्या जन्माच्या जागेसाठी माझे आयुष्य गहाण झाले (गहाण)
*****************
दिवा वंशाचा पेटतो, अशी पारखून वात गर्भ सोयीचा घेताना, फुले देहाची आरास अंग बघून फुलाचं झाड जाळतं मोहोर कशी बाटली नजर, कधी फाटला पदर आता मायेच्या उरात, नव फुटलं जहर (सोनोग्राफी)
*****************
तुझा परका उंबरा, रोज मराण मागतो माझ्या माहेरची लाज, रोज येशीला टांगतो तण माजलं दु:खाचं, जावं कव्हाळी घेवून
पायी भिंगऱ्या बांधल्या, कशी झाले वनवासी दोन घरं उजळाया, वात केली या देहाची असा टांगलेला दिवा, पाही दिवाळी दुरून ! (सासरचं ऊन)
*****************
हा भार तुझ्या देहाचा मातीने मिरवत न्यावा प्रत्येक ऋतूचा पक्षी तुजला शोधीत यावा पाहून तुझ्या बहराला जगण्याला पंख फुटावे (हिरवे हिरवे )
*****************
दुःख सोबतीला घेऊ
दुःख उगाळत राहू
या दुःखाच्या नादानं
नव्या जिंदगीला पाहू
(दुःखाच्या नादानं)
*****************
लोकशाही असो की हुकूमशाही सत्तेला गुलाम हवे असतात कुठलेच सत्ताधारी नवे नसतात सत्तेला गुलामाचे थवे लागतात
तत्त्वज्ञानाच्या बियाणावर ही मतांची फळे काढतात गुलाम, राजा ही बाजू बदलून ते शोषणांचे गळे काढतात
पैसा, मुजोरी, जात, वंश ही हत्यारे असतात सोबतीला खिरापत योग्य ती वाटून ते नगारे आणतात नौबतीला (चव्हाटे)
*****************
समजून घेतल्याशिवाय जगता येत नाही जगून झाल्याशिवाय बघता येत नाही पोचायचे कुठेतरी हे ठरवायचे नसतेच पण, नक्की ठरल्याशिवाय निघता येत नाही.
विचार न करता नुसते चालायचे उत्तर शोधायचे ना प्रश्न घालायचे येईल तसे अंगावर घेत पाय रोवायचे आयुष्यभर उभे राहून दोन हात ठेवायचे. (आयुष्य) "
यावरूनच लक्षात येते की, जोशी यांची कविता लोकप्रिय का आहे. कारण, या कवितेला रसिकांच्या अंतर्मनाचा परीसस्पर्श झाला आहे, या कवितेने चिरंतन होवून माय मराठीच्या वैभवात आणखीन भर घालावी, मनोभावे सेवा करावी, याच मनस्वी सदिच्छा, कविवर्य दिनकर जोशी यांच्या सोबतच साहित्य क्षेत्रात आज अमर हबीब, बालाजी सुतार, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, विश्वंभर वराट गुरूजी, प्रा.डाॅ.मुकूंद राजपंखे, दगडू लोमटे, प्रा.गौतम गायकवाड, प्रा.भगवान शिंदे, प्रा.विष्णु कावळे, डाॅ.देवराज चामनर हे अंबानगरीचा नांवलौकीक सर्वदूर वाढवित आहेत, एकता फाउंडेशन शिरूर कासार (जि.बीड) आणि शांतीवन, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक 26 आणि मंगळवार, दिनांक 27 डिसेंबर रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अंबाजोगाईचे प्रख्यात कवी दिनकर जोशी हे भूषविणार आहेत. त्याबद्दल जोशी सरांच्या निवडीचे साहित्य वर्तुळ, मिञ परीवार तसेच आमच्याकडून ही स्वागत व अभिनंदन.
शब्दांकन :
- रणजित डांगे, अंबाजोगाई
9403927527
========================
Comments
Post a Comment