सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या भेटीचा दगडूदादा लोमटे यांना झालेला आनंद त्यांच्याच शब्दांत..!



सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या भेटीचा दगडूदादा लोमटे यांना झालेला आनंद त्यांच्याच शब्दांत..!

======================

अरविंद जगताप हे पाडळशिंगी जिल्हा बीड येथील रहिवाशी. शेतकरी कुटुंबात जन्म झालेला. आता मुंबई काबीज केली, आहे करीत आहेत. आपल्या आवडीच्या कलेच्या क्षेत्रात आज दूरवर नांव पोहचले आहे. पत्र प्रपंच त्यांनी सुरू केला. अलीकडे व्हाॅट्सॲप व इंटरनेट मुळे मेलवर पत्र जावू लागले. पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र हे विसरून गेले. त्याला संजीवनी देण्याचे काम अरविंद जगताप यांनी केले. माझ्या "राहून गेलेली पत्रे" या पुस्तकाला त्यांनी ब्लर्ब लिहिले ते खाली दिले आहे. माझी व त्यांची प्रत्यक्ष भेट काल बीड मध्ये दीपाताई क्षीरसागर यांच्या सेवागौरव कार्यक्रमात झाली. मला फार आनंद झाला. साधी राहणी, स्वभाव मनमिळावू, कुठलाही अभिनिवेश नाही. अशीच प्रगती आपली होवो अशीच निर्मळ प्रार्थना आहे..!


लेखक : दगडू लोमटे, (अंबाजोगाई )

9823009512


********************



"राहून गेलेली पत्रे" या दगडूदादा लोमटे लिखित पुस्तकासाठी सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप सर (मुंबई) यांनी दिलेला अभिप्राय खास आपल्यासाठी...!



सहसा एका माणसाने दुसऱ्या माणसाशी साधलेला संवाद असतो. त्यात तिसऱ्या माणसाला वाचण्यासारखं फार काही नसतं. किंवा वाचताना खुपदा ते गॉसिपच वाटतं. बहुतेक पत्र घरातल्या अडगळीत हरवून जातात. पण काही पत्र हरवण्यासाठी नसतात. मिरवण्यासाठी असतात. पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी असतात. कारण अशी पत्र नितळ माणसांनी नितळ माणसांना लिहिलेली असतात. दगडू लोमटे सरांची पत्रं अशीच आहेत. महाराष्ट्रातल्या मनमोकळ्या माणसांच्या आठवणी आणि कर्तृत्वाचा दस्तावेज आहेत ही पत्र. आणी ही कुणा गुगलवर माहिती गोळा करून लिहिणाऱ्या बोरू बहाद्दराने लिहिलेली नाहीत. ही मुळात जातिवंत चळवळ्या माणसाने प्रत्यक्ष अनुभवेल्या माणसांना लिहिलेली पत्र आहेत. एखादं पुस्तक वाचताना आपण त्यातल्या शैलीने, शब्दकळेने मोहित होतो. कल्पनाविश्वाने प्रभावित होतो. पण यात आपलं असं काही होत नाही. आपण पानोपानी खुजे समजू लागतो स्वतःला. दगडू लोमटे एवढ्या मोठ मोठ्या माणसांना एवढ्या जवळून ओळखतात, आपुलकीने भेटतात. त्यांच्या कामाचा अविभाज्य भाग होतात. आणि हे सगळं एवढ्या सहजपणे ते मांडत जातात की आपल्याला आपण अजून असं भारी काहीच जगलो नाही, जग बघितलच नाही याची जाणीव होते. या पत्रांना कृत्रिम शैली किंवा शब्दकळा नाही. असंख्य चळवळीतून घडलेल्या कार्यकर्त्याची ही थेट भाषा आहे. चळवळीतून बिघडलेली माणसं आपण खूप बघतो. कारण, ते चटकन लोकप्रिय होतात. शेतकऱ्याला चळवळीच्या नावाने फसवून नेते आणी मंत्री झालेल्या अनेक गारगोट्या आपण ओळखत असतो. पण, चळवळीतून जे काही हिरे निर्माण होतात त्यापैकी एक दगडू लोमटे. त्यांनी जेवढ्या विविध प्रकारच्या माणसांशी स्नेह जोडलाय तो एकांगी विचाराच्या कुणाला शक्य नाही. आजकाल माणसं गटाची आणि विचारधारेची गुलाम आहेत. दगडू लोमटे यांच्यासारखी फार कमी माणसं आहेत जी माणूस म्हणून माणसांशी जोडली गेलेली आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या कौतुकाला गटबाजीचा वास येत नाही. त्यांची पत्र वाचताना आपल्याला असं लिहिता यावं असा मर्यादित विचार येत नाही. आपल्याला असं जगता यायला हवं असं वाटू लागतं. त्यांना खूप खूप शुभेच्छा. दगडू लोमटे सर या पत्रांना राहून गेलेली पत्रं म्हणतात. पण, आपल्यासाठी ही मनात राहून गेलेली पत्रं आहेत. 

- अरविंद जगताप, (मुंबई)


======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)