मौजे पाटोदा (ममदापूर) येथे एका विशेष समारंभात संविधान स्तंभाचे लोकार्पण
मौजे पाटोदा (ममदापूर) येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या संविधान रॅलीने लक्ष वेधले
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
तालुक्यातील मौजे पाटोदा (ममदापूर) येथे भारतीय संविधान स्तंभ लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त गावात विविध उपक्रम राबविण्यात आले.
मौजे पाटोदा (ममदापूर) ता.अंबाजोगाई येथे संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधान स्तंभ लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. संवेदना फेलोशिपच्या मुक्ता पाडुळे यांच्या संकल्पनेतून हा संविधान स्तंभ गावात उभारण्यात आलेला आहे. सर्वप्रथम गावामधून जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींची संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भारतीय संविधानात समाविष्ट असलेल्या विचारमुल्यांचे "उठ नागरिक जागा हो, संविधानाचा धागा हो" असे घोषवाक्य असलेले फलक मुला-मुलींनी विविध महापुरूषांची वेषभूषा साकारत झळकावले, तसेच यावेळेस भारतीय संविधानातील मुल्यांचा जागर करणारे छोटेखानी चिञप्रदर्शन देखिल भरविण्यात आले होते. या उपक्रमात गावातील सर्वधर्मीय ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर संविधान निर्माते "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, भारतीय लोकशाही, संविधान चिरायू होवो" या नागरिकांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रारंभी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक कांबळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय व महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर भारतीय संविधान स्तंभाचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन सरपंच बाळासाहेब देशमुख, सर्व सन्माननिय ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळेस 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शुरवीरांचे स्मरण करून सर्व गावकऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संविधानाचे प्रचारक धीमंत राष्ट्रपाल यांनी उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून दिले आणि विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी उपसरपंच गोविंद जामदार, शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाडुळे, पत्रकार खाजामियाँ पठाण, अविनाश उगले, बळीराम सरवदे, नारायणराव मुळे, मारूती सरवदे, आकाश देशमुख, कैलास पाडुळे, चंद्रमणी सरवदे, अर्चना वायदंडे, अविनाश पाडुळे, चंद्रकला जाधव, रत्नदीप सरवदे, गणेश जोगदंड तसेच पाटोदा (ममदापूर) येथील जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एम.ए.शेख, शिक्षक एम.आर.सोनवणे, ए.व्ही.यादव, शिक्षिका चवरे मॅडम, पवार मॅडम, गाडवे मॅडम, भगत मॅडम आणि अंगणवाडी ताई तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्यासह गावातील सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवर आणि गावकऱ्यांनी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. केवळ एक दिवसच संविधान उद्देशिकेचे वाचन न करता या पुढील काळात सर्व महापुरूषांच्या जयंती आणि सार्वजनिक कार्यक्रमात देखिल भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येईल, याची सुरूवात आमच्या मौजे पाटोदा (ममदापूर) या गावापासून झाली आहे याचा मनापासून आनंद होत असल्याचे संविधानाचे प्रचारक धीमंत राष्ट्रपाल यांनी सांगून समस्त ग्रामस्थांचे आभार मानले.
=======================
Comments
Post a Comment