लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क

शेत व शेतकरी वाचवायचा असेल तर राजकारणापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे - ॲड.अजय



बुरांडे 

-------------------------------

अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी) 

आज शेत व शेतकरी धोक्यात आहे. शेती सारखा मोठा व्यवसाय भांडवलदार कंपन्यांकडे जाणार नाही. याची दक्षता घेऊन शेत व शेतकरी वाचविण्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते एॅड.अजय बुरांडे यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील तिसऱ्या दिवसाची सुरूवात शेतकरी परिषदेने झाली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून एॅड.अजय बुरांडे बोलत होते.


शेतकरी परिषदेसाठी वक्ते म्हणून कृषी महाविद्यालय, अंबाजोगाईचे प्राचार्य डॉ.संजीव बंटेवाड हे होते. तर अध्यक्षस्थानी प्रयोगशील शेतकरी पंजाबराव देशमुख व स्मृती समारोह समितीचे कोषाध्यक्ष व शेतकरी परिषदेचे संयोजक सतीश नाना लोमटे व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या विस्तारित भाषणात एॅड.अजय बुरांडे यांनी "शेती शेतकरी आणि पीक विमा" या विषयावर सखोल मार्गदर्शन करून पीक विमा ही शेतकऱ्याच्या हितासाठी आहे का विमा कंपनीच्या हितासाठी आहे असा सवाल करून अनेक जाचक अटींमध्ये बदल झाला पाहिजे. पिक विमा शेतकऱ्यांसाठी अतिशय गरजेचा आहे. स्वामीनाथन आयोगामध्ये ही पीक विम्याबद्दल उहापोह करण्यात आलेला आहे. 1999 पासून पिक विमा प्रारंभ झाला आहे पण आजचे चित्र वेगळे आहे. एक कोटी एकोणीस लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले त्यात फक्त 17 लाख अर्ज मंजूर होऊन बारा लाख अर्ज धारकांना परतावा मिळाला आहे. बाकीचे प्रतीक्षेतच आहेत. शेतकरी भूमिहीन होणार नाही याची दक्षता शासनाने व कृषी विद्यापीठांनी घेण्याची गरज आहे.



अतिरिक्त किटकनाशकांचा वापर टाळण्याची गरज आहे 

- डॉ.संजीव बंटेवाड 

----------------------------------------

एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.संजीव बंटेवाड म्हणाले की, महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ व संशोधन केंद्र आहेत त्या मार्फत शेती व्यवसायासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान कसदार बियाणे व रोग नियंत्रण यावर अभ्यास व संशोधन करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला. की, मोठ्या प्रमाणात किटकनाशकांचा वापर केला जात आहे. त्या प्रमाणाबाहेर किटकनाशक द्रव्याच्या वापरामुळे किटकांची प्रतिकारशक्ती वाढत आहे. किटनाशक फवारणी नंतर त्या पिकावर वीस दिवस किटनाशक द्रव्याचा अंश राहतो याचा विचार न करता ही पिके बाजारात येऊन आपल्या पोटात जातात त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. किटकनाशका बरोबर तणनाशकाचा ही वापर वाढला आहे त्यामुळे शंखी गोगलगाय रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी बांधवांना जैविक किटकनाशकांचा वापर करा, चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे घ्या, पिकाची फेरफार करा, पिकामध्ये आंतरपीक घ्या, जैविक पद्धतीने कीड नियंत्रण केल्यास उत्पादनात वाढ होईल, शेतीच्या विभाजनामुळे उत्पादनात मोठी घट झालेली आहे. प्रारंभी शेतकरी परिषदेचे संयोजक सतीश नाना लोमटे यांनी प्रास्ताविक केले. उद्योग म्हणून शेती करा. कृषी उद्योग ही भारताची संस्कृती आहे. अनेक अनिष्ट प्रथा, रूढी परंपरा, लहरी निसर्ग, बदलते हवामान यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली पाहिजे यासाठी शेतकरी परिषदा होऊन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य गेल्या 37 वर्षांपासून या समितीमार्फत करीत आहोत. या शेतकरी परिषदेमध्ये आयोजित पीक स्पर्धेत सुधाकर देशमुख (तुरीचे पीक) व किसनराव भोसले (उसाचे पीक) या विजयी शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबराव देशमुख यांनी आपले अनुभव कथन करून अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक शेख खमरोदिन यांनी तर आभारप्रदर्शन बाबुराव ढगे यांनी केले. शेतकरी परिषदेचे नियोजन डॉ.राम भालचंद्र विद्यालयातील शिक्षकवृंदांनी केले. शेतकरी परिषदेस मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.


================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)