विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जीवन जगण्याचा मंत्र दिला - रामभाऊ कुलकर्णी
खोलेश्वर महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा
=========================
अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टी ठेवून भारतीय संविधान लिहीले. व्यक्तीची प्रतिष्ठा, हक्क, कर्तव्य, इत्यादींचा अंतर्भाव आणि मानवतेची जाणीव ठेवून संविधान लिहिले. भारताच्या आदर्श लोकशाहीला दिलेले हे संविधान अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपल्या व्यक्तिगत जीवनात प्रत्येकाने या संविधानाची अंमलबजावणी केली पाहिजे. त्यासाठी महामानव डॉ.आंबेडकरांनी जीवन जगण्याचा मंत्र दिला, असे गौरवोद्गार केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी यांनी केले. ते राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. मंचावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश तळणीकर, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी, राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.तात्या पुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संविधान उद्देश पत्रिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.देवर्षी यांनी विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त केलेल्या लिखाणाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रूजविणे हा कार्यक्रम घेण्याचा खरा उद्देश आहे असे ते म्हणाले. संविधानाने आपणांस जीवन जगण्याचे हक्क दिले असे सांगून त्यांनी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अविनाश तळणीकर यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.तात्या पुरी यांनी, भारतीय राज्यघटनेत सर्वांना राजकीय, सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य दिले आहे असे सांगून भारतीय संविधान दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जी.आर.कावळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा.उमाकांत कुलकर्णी यांनी मानले.
==========================
Comments
Post a Comment