ज्येष्ठ संगीतकार व गायक प्रा.राजेश सरकटे यांनी संगीतबद्ध केलेल्या "मराठवाड्याचे काव्यवैभव" या संगीतमय कार्यक्रमास रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद..!
ज्येष्ठ संगीतकार व गायक प्रा.राजेश सरकटे यांनी संगीतबद्ध केलेल्या "मराठवाड्याचे काव्यवैभव" या संगीतमय कार्यक्रमास रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद..!
================
अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी - तालमार्तंड प्रकाश बोरगावकर याजकडून)
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहामध्ये ज्येष्ठ संगीतकार व गायक प्रा.राजेश सरकटे यांनी संगीतबद्ध केलेल्या "मराठवाड्याचे काव्यवैभव" हा काव्य आविष्काराचा संगीतमय कार्यक्रम यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या दुसऱ्या दिवशी संपन्न झाला. एकूण मराठी काव्यात गाथा, लावणी, पोवाडे, ओव्या, आरत्या,भजने, गवळणी, भारूडे, भोंडल्याची गाणी इत्यादींचा समावेश होतो. मराठी भाषेत संतकाव्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. पंडिती काव्य, छंदोबद्ध काव्य, चारोळी, चित्रपट गीते, नाट्य संगीत यांचा समावेश होतो. कवी मुकुंदराज यांना मराठीचे आद्यकवी म्हणून संबोधले जाते. त्यांनी विवेकसिंधू हा काव्यग्रंथ लिहिला आहे. अशा या आद्यकवींच्या नगरीमध्ये मराठवाड्याची काव्यवैभव ही आगळीवेगळी मैफिल साहित्य रसिकांना मंत्रमुग्ध करून देणारी ठरली. संत महदंबा, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव संत जनाबाई, संत एकनाथ यांच्या अविट भक्ती रचने सोबतच आद्यकवी, बी.रघुनाथ, वा.रा.कांत, कवियत्री अनुराधा पाटील, सुहासिनी इर्लेकर शैलाताई लोहिया, ना.धों. महानोर, प्रा.फ.मु.शिंदे, दासू वैद्य, श्रीधर नांदेडकर, इंद्रजीत भालेराव अशा प्रतिभावंत व प्रख्यात कवींच्या कवितेचे संगीतमय सादरीकरणाचा प्रथमच आद्यकविच्या नगरीत रसिकांना लाभ घेता आला. सर्व भक्तीगीतांचे व कवितांचे गायन प्रा.राजेश सरकटे यांच्यासह प्रा.राजेश यांची कन्या पायल सरकटे व संगीता भावसार यांनी केले.
"मराठवाड्याचे काव्यवैभव" या मैफिलीच्या सुरूवातीला संयोजक, ज्येष्ठ कवी तसेच विश्व साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष दगडू (दादा) लोमटे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर संयोजक सतीश (नाना) लोमटे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने सर्व कलावंतांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. मागील 38 वर्षांपासून यशस्वीपणे या महोत्सवाचे आयोजन केले जात असुन महाराष्ट्र व देशातील अनेक प्रतिभावंत प्रख्यात गायक - गायिकांची तसेच प्रतिभावंत कवी व लेखकांची हजेरी या महोत्सवास लागलेली आहे.
"मराठवाड्याचे काव्यवैभव" या कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी प्रा.राजेश यांना मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील व प्रा.दादा गोरे यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभलेले आहे. 'मराठवाड्याचे काव्यवैभव' हा कार्यक्रम आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये झालेला आहे. आज संपन्न झालेल्या या मैफिलीतील सर्व रचना मराठवाड्यातील संतांच्या तसेच कवींच्या होत्या. अगदी इसवी सन 1238 पासून ते आजपर्यंत काही प्रचलित तर काही अप्रचलित रचनांना प्रा.राजेश सरकटे यांनी संगीतबद्ध करून हे वैभव रसिकांसमोर आणण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे . निर्मिती संकल्पना संगीत व सादरीकरण अशा सर्वच बाजू त्यांनी अत्यंत भक्कमपणे सांभाळलेल्या आहेत.
मैफिलीच्या सुरूवातीला मराठवाड्यातील आद्य स्त्री कवयित्री म्हणून ज्यांच्या नावाचा गौरव केला जातो अशा महादाईसा अर्थातच महादंबा यांच्या सुरूवात झाली १२३८ साली जन्म झालेल्या व महानुभव पंथांचे संस्कार अंगी असलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पुरी पांढरी गावच्या महादंबा यांनी आपल्या ओवींद्वारे अप्रतिम भाव विश्व प्रगट केल आहे.
"वेडीयले जन श्रीकृष्ण केवल्य नाते । पाविले परमानंद दृष्टी पाते ।।" अशा पुरातन रचनांना संगीतबद्ध करणे इतकी ही सोपी गोष्ट नाही. परंतु, राजेश सरकटे यांनी हे शिवधनुष्य अगदी लिलया पेलले आहे. या ओवीच्या सादरीकरणांमध्ये प्रा.राजेशजी सोबतच त्यांची कन्या पायल सरकटे यांनी सादरीकरण केले. सरकटे घराण्यातील युवा पिढीचे नेतृत्व करणारी पायल गांधर्व मंडळाची विशारद परीक्षा उत्तीर्ण आहे स्वरातील ठामपणा , कवींच्या भावविश्वाशी साधर्म्य राखत केलेले शब्दोच्चार, सादरीकरणातील सहजता यामुळे रसिकांचे लक्ष वेधून घेत होती. संपूर्ण मराठवाड्यामध्ये अंबाजोगाईचा रसिक श्रोता अत्यंत जानकार असल्याचे भारतातील अनेक ज्येष्ठ कलावंतांनी नमूद केलेलं आहे. या मैफिलीमध्ये पायलने अनेकवेळा रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. प्रा.राजेश सरकटे यांची स्वरांची गुंफण अत्यंत प्रभावी होतीच परंतु, त्या सोबतच मनोज गुरव यांच्या अप्रतिम बासरी सहवादनाने परमानंदाची अनुभूती रसिकांना मिळत होती. महादंबा यांच्या ओवी नंतर प्रा.राजेश सरकटे यांनी मराठवाड्यातील गंगाखेडच्या संत श्रेष्ठ जनाबाई यांची भक्तीचा प्रचार आणि प्रसार करणारी रचना आनंद दोही जो का समूळ झाला नाही
ही रचना सादर केली. संतश्रेष्ठ जनाबाईंच्या रचना कानावर आल्या नाहीत असा एकही रसिक सापडणे दुरापासत इसवी सन 1250 पासून ते आजतागायत संतश्रेष्ठ जनाबाई यांच्या विविध प्रकारातील रचनांनी भक्ती सांप्रदायासोबतच सर्वसामान्य रसिकांनाही भुरळ घातलेली आहे.
मैफिलीचे विशेष आकर्षण होतं ते म्हणजे निरूपणकार डॉक्टर समाधान इंगळे. प्रत्येक कवींच्या रचनेचा साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये भावार्थ रसिकांना सांगण्याची त्यांची हातोटी अत्यंत सुलभ आणि विस्मयकारी होती. संतश्रेष्ठ जनाबाईंच्या रचनेनंतर नरसी येथील संतश्रेष्ठ नामदेव महाराज ज्यांनी भागवत सांप्रदायांमध्ये प्रथम अभंगाची रचना केली अशा संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या अभंगाचे सादरीकरण झाले भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा म्हणणाऱ्या नामदेव महाराजांनी मला धम्मापासून सोडव अशी विनवणी या अभंगातून केलेली आढळते "जिवलग कोड तुजविण होईल
जे माझे जाणेल जड भारी" संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या या रचनेला आणि प्रा.राजेश सरकटे यांनी संगीतबद्ध केलेल्या अमित चालीला संगीता भावसार यांनी अत्यंत हळुवारपणे रसिकांच्या मनाला साद घालेल अशा पद्धतीने सादरीकरण केले. त्यानंतर आपल्या मराठवाड्यातील दुसरे जेष्ठ कवी म्हणजेच भगवान रघुनाथ फुलारी अर्थातच ज्यांना आपण बी.रघुनाथ या टोपण नावाने ओळखतो जालना जिल्ह्यातील सातोना गावचे रहिवासी असणारे मी रघुनाथ मराठी भाषेला समृद्ध करणारे कवी म्हणून सर्वपरिचित आहेत एका पित्याची भावना त्यांनी आपल्या कवितेमध्ये शब्दबद्ध केलेली आहे. जेव्हा लेक नांदायला जाते, तेव्हा पित्याच्या मनाला लागलेली हुरहुर त्यांनी या कवितेमधून शब्दबद्ध केलेली आहे. प्रा.राजेश सरकटे यांची कन्या कु.पायल सरकटे यांनी बी.रघुनाथ यांच्या रचनेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. "चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, पंढरी या ओसरीची आज ओस झाली." मराठवाड्याच्या संत परंपरेतील वैभव असणारे संत भानुदास महाराज यांचे नातू संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांनी गवळण, अभंग, भारूड, भावार्थ रामायण अशा विविध प्रकाराद्वारे भक्तीला प्रतीकात्मकरीत्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अशा या संतांची रचना प्रा.राजेश सरकटे यांनी रंगदार शैलीमध्ये सादर केली लोककला प्रकाराचा स्पर्श असणारी ही रचना रसिकांची प्रचंड दाद मिळवून गेली. "भिंगाचे भिंगुले खांद्यावर डुले । नाचत तान्हुले यशोदेचे ।।" यानंतर बी.रघुनाथ यांचीच आणखी एक अप्रतिम रचना सादर करण्यात आली. असं म्हणतात की, "भाषा आणि नदी" या दोन्हीचा प्रवाह सारखाच असतो. नदीसोबतच भाषेचही पुनरूज्जीवन व्हायलाच हवे आणि यासाठीच बी.रघुनाथ यांच्यासारख्या कवींनी आपल्या रचनेमधून प्रयत्न केलेला दिसून येतो. भाषेतील संजीवनी अधोरेखित करणारी त्यांची रचना म्हणजे "पाखरा कर शेजारी निवास । विरह तमाच्या लाटा उठोनी।।" बी.रघुनाथ यांच्या रचनेनंतर संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक म्हणून ज्यांची ओळख आहे. अशा ज्येष्ठ कवयित्री डॉ.सुहासिनी इर्लेकर यांची प्रेम भावना व्यक्त करणारी कविता प्रा.राजेश सरकटे यांनी सादर केली. "डोळ्यात रंग ओले भोळे अभंग ओटी ।
मी आज गात आहे. गाणी तुझ्याचसाठी ।।" मराठवाड्याची "काव्यवैभव" ही मैफिल ज्यांच्या प्रेरणेने निर्माण झाली असे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या सहचारीने असलेल्या कवयित्री पाटील यांची रचना कु.पायल सरकटे यांनी सादर केली. पाटील यांच्या कविता हिंदी, उर्दू, ओडिया,राजस्थानी, पंजाबी अशा अनेक भाषेत जगभर पोहोचलेल्या आहेत. सखोल भावना सरळ शब्दांत मांडणारी त्यांची रचना "उभ्या विनाशी सावल्या दूर आभाळाच्या काठी ।
माझ्या मनातले गाव शब्द उदासले ओठी ।। " त्यांचीच दुसरी रचना अगदी अर्थ भावना व्यक्त करणारी यानंतर सादर करण्यात आली शिवरंजनी रागामध्ये प्रा.राजेश सरकटे यांनी सादर केलेली ही रचना रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारी अशीच होती, "किती काही देतो आपण । शब्दांच्या पलीकडे जाऊन । मग काय ऐकण्यासाठी । हुंदका गळ्यात दाटतो ।।" या ज्येष्ठ कवयिञी अनुराधा पाटील यांच्या रचनेनंतर मराठवाड्याचे अस्सल बावनकशी सोनं असणाऱ्या फ.मुं.शिंदे यांची रचना सादर करण्यात आली. फ.मुं.शिंदे यांच्या कविता जवळपास सर्वच प्रकारांमध्ये येतात. विनोदी, अवखळ शैली सोबतच अनेक वेळा त्यांच्या कवितेमधून जगण्याचा आशयही प्रकर्षाने जाणवतो.
"गळली पाने, उदास राणे सुख-दुःखाचे येणे जाणे" असं भावस्पर्शी काव्यलेखन करणाऱ्या फ.मुं.शिंदे यांच्या कवितेला प्रा.राजेश सरकटे यांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. फ.मुंच्या कवितेनंतर राष्ट्रसेवा दलाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्या "भारत जोडो" सारख्या अत्यंत संवेदनशील अभियानामध्ये स्वतःला झोकून दिलेल्या कार्यकर्त्या, मनोरंजनाची सीमित साधने असताना मिळण्याच्या रूपाने गावोगावी फिरून प्रबोधन करणाऱ्या, स्वतः संगीत विशारद असणाऱ्या, भावविभोर मनाच्या स्वर्गीय डॉ.शैलाभाभी लोहिया यांची गझल संगीता भावसार यांनी अप्रतिमरीत्या सादर केली. प्रा.राजेश सरकटे यांनी रूपक तालामध्ये स्वरबद्ध केलेली ही गझल रसिकांना संमोहित करून गेली. "चांदण्याचा पूर आता लागला रे ओसरू ।
दूर होईल साजना वस्त्र दे मज सावरू ।।" स्वर्गीय शैलाभाभी लोहिया यांच्या रचनेनंतर श्रीधर नांदेडकर यांची अभंग सदृश रचना कु.पायल सरकटे यांनी सादर केली सत्याच्या अंगणी भ्रमाचा पाचोळा ।" त्यानंतर नांदेड येथे जन्मलेल्या परंतु, कर्तुत्वाचे धुमारे आद्यकवी मुकुंदराजांच्या नगरीमध्ये फुटलेल्या प्रा.दासू वैद्य यांची बालकविता संगीता भावसार यांनी सादर केली. 'तूर्तास' या पहिल्या कविता संग्रहापासून सुरूवात केलेल्या प्रा.दासू वैद्य यांनी कवितेतील सर्वच प्रकार हाताळताना कथा कादंबऱ्या या सोबतच चित्रपटांसाठी पटकथा लेखणी तितक्याच ताकदीने केलेली आहे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्काराचे धनी इथे झालेले आहेत 'क कवितेचा' या बालसंग्रहातील "आभाळाचा ढोल ताशा बेडकांची गाणी । पावसाचं पाणी बाई पावसाचं पाणी ।।"
ही बालकविता प्रा.राजेश सरकटे यांनी अशा पद्धतीने संगीतबद्ध केली होती की बालकांसोबतच ज्येष्ठ रसिकांनीही यावर ठेका धरला. प्रा.दासू वैद्य यांच्या बालकवीतेनंतर या नभाने या मातीला दान द्यावे असे सांगणारे तसेच "सूर्यनारायणा नित्य नियमाने उगवा" अशी हक्काने साद घालणारे शेती आणि शेतकरी हा ज्यांच्या जिवाचा विषय असे ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांची रचना "झाड झाली हिरवीशी शीळ घुमते रानात । ओल जांभळ्या मेघांची वाहे नदीच्या पाण्यात ।। " ही रचना राजेश सरकटे व संगीता भावसार या दोघांनी मिळून सादर केली नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहासारखी रसिकांना आपलंसं करून घेणारी ही रचना अप्रतिमच होती. त्यानंतर संगीता भावसार यांनी "कुरवाळूनी करीशी मनधरणी चेतना तुझी कळली करणे" या अत्यंत भावस्पर्शी कविता आपल्या गोड आवाजा मध्ये सादर केली. गाव आणि शहर असे दोन देश विभागले गेले आहेत. शहराला गावाचा परिचय करून देणारे कवी त्याचप्रमाणे आपल्या काळ्या आईवर जीवापाड प्रेम करणारे कवी म्हणून आपण कवि इंद्रजीत भालेराव यांना ओळखतो. त्यांच्या कवितेचा आशय आणि विषय सतत ग्रामीण जीवनशैली असाच राहिलेला आहे. अशा प्रख्यात कवी इंद्रजीत भालेराव यांची सुप्रसिद्ध काव्यरचना
"काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता ।
चल गावाकडे चल माझ्या दोस्ता ।।"
प्रा.राजेश सरकटे यांनी सादर केली. ही रचना सादर करत असताना "हे माझ्या राजा, हे माझ्या सर्जा" ही शब्दफेक, स्वरांमधील आर्तता रसिकांना प्रकर्षाने जाणवत होती. या मैफीलीचा समारोप स्वतः राजेश सरकटे यांनी वेगळ्या पद्धतीने बांधणी केलेल्या भैरवी रागातील पसायदानाने झाला. स्वतः राजेश सरकटे संगीता भावसार व कुमारी पायल सरकटे यांनी पसायदान सादर केले. या कार्यक्रमास प्रमोद जांभेकर (व्हायोलीन पुणे), मनोज गुरव (बासरी,मुंबई), जगदीश व्यवहारे ( तबला), राजेश देहाडे (कीबोर्ड), राजेश भावसार (रिदम्स), विजय खंडागळे (ढोलक) यांनी विविध वाद्यांवर अतिशय उत्कृष्टरीत्या साथ संगत केली. कवितेचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.समाधान इंगळे यांनी अत्यंत समर्पकपणे करून मैफिलीची रंगत वाढवली. या बहारदार संगीत मैफीलीसाठी संजय सरकटे व विनोद सरकटे यांनी व्यवस्थापन केले होते.
शब्दांकन : तालमार्तंड प्रकाश बोरगावकर
(अंबाजोगाई, जि.बीड.)
================
Comments
Post a Comment